वैष्णवांचा मेळा पुण्यात
By admin | Published: June 30, 2016 01:12 AM2016-06-30T01:12:16+5:302016-07-02T12:56:42+5:30
पंढरीच्या विठुरायाचा मुखी अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखल झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले.
पुणे : पंढरीच्या विठुरायाचा मुखी अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखल झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले. पाटील इस्टेट येथील उड्डाणपुलाखालच्या चौकात पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून विशेष कक्ष उभारण्यात आला होता. याचबरोबर इतर राजकीय पक्ष, संस्था, बँका यांनीही स्वागतासाठी कक्ष उभारले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे पाटील इस्टेट इथे आगमन झाले.
संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे चाक पंक्चर झाल्याने त्यांना येण्यास दोन तासांचा विलंब झाला. पाटील इस्टेट येथील चौकात रात्री पावणेआठच्या सुमारास ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे आगमन झाले. महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेविका आशा साने, सुनंदा गडाळे, नंदा लोणकर, रेश्मा भोसले यांनी पालखीचे स्वागत केले. महापौरांनी संत तुकाराममहाराजांच्या पालखीरथामध्ये चढून काही वेळ रथाचे सारथ्य करून पालखीचे स्वागत केले. पालख्यांचे आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. चौकात दोरीने फुलांच्या करंड्या बांधण्यात आल्या होत्या, पालखी चौकात येताच या करंड्यांमधील फुलांचा वर्षाव करण्यात आला. ‘बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम, ज्ञानोबा माऊली.. माऊली’ असा एकच जयघोष या वेळी झाला. स्वागताचे अत्यंत मनोहारी दृश्य या वेळी पाहायला मिळाले. ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीला विलंब झाल्याने वेगाने ती पुढे मार्गस्थ झाली.
पालख्यांचे स्वागत करताना प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुणेकर कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालख्यांचे आज आगमन झाले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर आसुसलेले आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम पुण्यात असेल. या काळात पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांच्या आगमनाने पावसाचा वर्षाव व्हावा, असे पांडुरंगाला साकडे आहे.’’
पाटील इस्टेट येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये वीणाधारी वारकऱ्यांना श्रीफल देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. कक्षातील स्पीकर भक्तिगीते लावण्यात आली होती.
वरुणराजाने लावली हुरहुर
शहरात पालख्यांचे आगमन होताना त्यांचे स्वागत करायला वरुणराजा हमखास येत असतो. यंदा जून संपत आला तरी अजून पुरेसा पाऊस झालेला नाही; त्यामुळे पेरण्या न करताच अनेक शेतकरी वारीत सहभागी झाले आहेत. पुण्यामध्ये प्रवेश करीत असताना दर वर्षी न चुकता येणारा पाऊस यंदा न आल्याने वारकऱ्यांना मोठी हुरहुर लागल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.