वाजपेयी पुण्यात सायकलवरून फिरायचे, जनसंघापासून पुण्याशी नाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 01:07 AM2018-08-17T01:07:37+5:302018-08-17T01:07:55+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आणि पुण्याचा स्नेहबंध खूपच जुना आहे. त्यांचे जनसंघाच्या कामासाठी पुण्यामध्ये अनेकदा येणे होई.
पुणे - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आणि पुण्याचा स्नेहबंध खूपच जुना आहे. त्यांचे जनसंघाच्या कामासाठी पुण्यामध्ये अनेकदा येणे होई. पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वैयक्तिक स्नेह होता. असेच ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आणि जनसंघाचे कार्यकर्ते अरविंद लेले यांच्याशी त्यांचा अत्यंत जवळचा स्नेह होता. जनसंघाची स्थापना झाल्यानंतर साधारणपणे १९५२ ते ५४ या कालावधीदरम्यान वाजपेयी जेव्हा जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा लेलेंसोबत सायकलवरून पुण्यातील कार्यकर्त्यांच्या घरी फिरायचे. मोतीबाग संघ कार्यालयाशेजारील सायकल दुकानामधून या सायकली भाड्याने घेतल्या जात. त्यांच्यामधील हाडाचा कार्यकर्ता या निमित्ताने पुणेकरांना अनेकदा अनुभवायला मिळाला.
जनसंघाच्या कामासाठी लेले आणि वाजपेयी एकत्र फिरायचे. या संपर्कामधून त्यांच्यामध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता. वाजपेयी त्यांच्या घरी येऊन गेल्याचे लेले यांचे पुत्र मिलिंद व हेमंत यांनी सांगितले. अरविंद लेले विधानसभेच्या निवडणुकीला उभे असताना त्यांच्या प्रचारासाठी वाजपेयी आलेले होते. हा स्नेह वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतरही कायम होता. वाजपेयी पंतप्रधान असताना पुण्यात आलेले होते. ते काही काळ शासकीय विश्रामगृहावर थांबलेले होते. त्यावेळी लेले तेथे गेले. त्यांना सुरक्षारक्षक आत सोडत नव्हते. काही दिग्गज नेतेही तेथे उभे होते. तेव्हा लेले यांनी खिशातून एक चिठ्ठी काढून सुरक्षारक्षकाच्या हाती दिली. या चिठ्ठीवरून त्यांना तत्काळ आत सोडण्यात आले. लेले यांनी वाजपेयी पुण्यात येणार असल्याचे समजताच त्यांना वैयक्तिक पत्र पाठवून भेटीची वेळ आणि परवानगी घेतलेली होती.
वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा नेमके लेलेंच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना कार्यक्रम पाहता येत नव्हता. त्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अवस्थेत वाजपेयींवर त्यांनी ‘उंच पर्वताची खोली अथांग आहे’ ही कविता रचली. तोंडी सांगितलेली ही कविता लेलेंच्या पत्नीने लिहून घेतली. तिसऱ्यांदा वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा लेले यांचा दुसरा मुलगा हेमंत यांचा विवाह होता. त्याच दिवशी वाजपेयींचा शपथविधी होता. गो. ल. आपटे सभागृहात विवाह सोहळा सुरू असताना त्यांनी हा सोहळा थांबविला. सभागृहातील टीव्हीवर सर्वांना शपथविधी पाहायला लावला.
‘मेरी इक्यावन कविताएं’ या कवितासंग्रहाचा भावानुवाद केल्यावर त्याची प्रत वाजपेयींना पाठविण्यात आली. त्यांनी संमती दर्शविल्यानंतर ‘गीत नवे गातो मी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आल्याची आठवण मिलिंद लेले यांनी सांगितली.
रज्जूभय्यांच्या अंत्यविधीला पुण्यात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सरसंघचालक राजेंद्र सिंहजी ऊर्फ रज्जूभय्या यांचे पुण्यामध्ये १४ जुलै २००३ रोजी निधन झाले. ते पुण्यातील पर्वती जवळील कौशिक आश्रमामध्ये वास्तव्यास होते. त्यांची अंत्ययात्रा नवीन मराठी शाळा ते वैकुंठ अशी निघाली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयी यांनी पुण्यात आल्यावर मोतीबाग संघ कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर ते वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी वैकुं ठ स्मशानभुमीला केवळ एकच प्रवेशद्वार होते. पंतप्रधान वाजपेयींच्या सुरक्षेच्यादृष्टिने विद्युत दाहिनीच्या बाजुला असलेले दुसरे प्रवेशद्वार रात्रीतूनच तयार करण्यात आले होते. याच प्रवेशद्वारातून ते वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आले होते.