ठेकेदारांवर कारवाई करणार : वैजयंती उमरगेकर
By admin | Published: March 25, 2017 03:23 AM2017-03-25T03:23:45+5:302017-03-25T03:23:45+5:30
आळंदी नगर परिषद हद्दीत ठेकेदारांमार्फत पथारीधारकांकडून अतिक्रमण शुल्क म्हणून केली जाणारी बाजार वसुलीची रक्कम संबंधित ठेकेदार वेळेत पालिकेकेडे जमा करीत नाहीत.
शेलपिंपळगाव : आळंदी नगर परिषद हद्दीत ठेकेदारांमार्फत पथारीधारकांकडून अतिक्रमण शुल्क म्हणून केली जाणारी बाजार वसुलीची रक्कम संबंधित ठेकेदार वेळेत पालिकेकेडे जमा करीत नाहीत. याबाबत ठेकेदार आणि पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी नाराजी व्यक्त करून लेखी पत्रामार्फत आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी काळात वेळेत भरणा न केल्यास ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदी पालिकेने शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण कमी व्हावे, यासाठी अतिक्रमण शुल्क म्हणून वार्षिक पद्धतीने बाजार वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराकडे दिलेला आहे. दर महिन्याला ठेकेदाराने ३५ हजार ५०० रुपये नगर परिषदेकडे जमा करायची व उर्वरित रक्कम स्वत:कडे ठेवायची, असा करार यामध्ये करण्यात आला. त्यानुसार शहरातील ठिकठिकाणी असलेल्या अतिक्रमणधारक पथारी विक्रेते, हातगाड्या आणि भाजी मंडईत ठेकेदार नित्याने वसुली करीत आहे. परंतु, वसूल केलेली रक्कम करारानुसार नगर परिषदेकडे वेळेत जमा करत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे.
उमरगेकर म्हणाल्या, की आजपर्यंत दुर्लक्ष केल्यामुळे हे प्रकार फोफावत गेले. ४ महिन्यांची
सुमारे सव्वातीन लाख रुपये थकबाकी येणे बाकी होती. याबाबत जमा करण्यास सांगितल्यानंतर संबंधित ठेकेदाराने बाजार वसुलीचे एक
लाख ४२ हजार रुपये पालिकेत
भरणा केला. मात्र, अद्यापही पावणेदोन लाख रुपये थकबाकी येणे आहे. (वार्ताहर)