#Valentine special : जगाच्या नाकावर टिच्चून लग्न करणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी जोडप्याची कहाणी आवर्जून वाचा !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 05:10 PM2019-02-13T17:10:04+5:302019-02-13T17:21:55+5:30
'हमने प्यार किया है' किंवा 'दुनिया की कोई भी दिवारे हमे एक दुसरे से अलग नहीं कर सकती' ही वाक्य सिनेमात छान वाटत असली तरी प्रत्यक्षात जगायला तितकीच अवघड आहेत .
पुणे : 'हमने प्यार किया है' किंवा 'दुनिया की कोई भी दिवारे हमे एक दुसरे से अलग नहीं कर सकती' ही वाक्य सिनेमात छान वाटत असली तरी प्रत्यक्षात जगायला तितकीच अवघड आहेत. ही कहाणी आहे माधुरी सरोदे आणि जय शर्मा यांची. यातली माधुरी तृतीयपंथी आहे. त्यामुळे त्यांची कहाणी वेगळी ठरत नाही पण त्या दोघांनी अधिकृत आणि विधिवत लग्न करून आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतातील पहिल्या तृतीयपंथी वैवाहिक जोडप्याचा मान या जोडप्याला मिळाला आहे. या जोडप्याची कथा एखाद्या चित्रपटासारखी उत्कंठावर्धक आहे.
माधुरी पूर्वी अनेक स्टेज शो करायची. लावणी, कथक नृत्य हा तिचा हातखंडा. हे सर्व सुरु असताना सगळ्यांच्याप्रमाणे तिचेही फेसबुक अकाउंट होते. त्यातही तिने स्वतःची ओळख कधीही लपवली नाही. अचानक तिच्या इनबॉक्समध्ये महाराष्ट्र- गुजरात सीमेजवळ राहणाऱ्या जय शर्मा या तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती एक्सेप्ट केली आणि गप्पांचा सिलसिला सुरु झाला. एक दिवस त्याची परीक्षा घेण्यासाठी तिने त्याला मुंबईत बोलावलं आणि अवघ्या दोन तासात कशाचीही पर्वा न करता तो आला. फेसबुकावरची मैत्री बहरत होती आणि एक दिवस त्याने विचारलं ' आपण कायम सोबत राहू शकतो का ?' ती म्हणाली, ' हो पण अधिकृत लग्न करूनच ! त्याने क्षणाचाही विचार केला नाही आणि म्हणाला 'हो करूया'
लग्न करण्याचं तर ठरवलं पण बैठक चालली ती पाच तास. का लग्न करायचं आहे, ती तृतीयपंथी आहे, हा नॉर्मल आहे मग हे नातं कशासाठी असे हजारो सवाल समोर येत होते. त्याचे मित्र तर तूला मुली मिळतील मग एका हिजड्याशी लग्न कशासाठी असं समजावत होते. पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. त्यामुळे अखेर सगळ्यांची समजूत काढत त्यांनी लग्न केलं आणि एक गोड प्रेमकहाणी अधिकृत झाली. लग्न झाल्यावर त्यांच्यावरची संकट संपली नव्हती. माधुरीचे सत्य जय यांच्या आईंना त्यांनी सांगितले नव्हते. जुन्या विचारात आणि वातावरणात वाढलेल्या त्या हे स्वीकारणार नाहीत म्हणून सारे साशंक होते. योग्य वेळी आणि सुरळीत संसार सुरु झाल्यावर त्यांना हे सांगू असे दोघांनी ठरवले पण लग्नाची बातमी जगभरातल्या माध्यमात प्रसिद्ध झाली आणि सत्य समोर आले. त्यानंतर सुमारे सहा महिने दोघेजण घरातल्यांसोबत संवादाचा प्रयत्न करत होते. हो- नाही करत अखेर तेही मानले आणि माधुरी शर्मांची सून झाली.
या सगळ्या घटनेला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. वरकरणी हे सोपं दिसत असलं तरी मानसिकता बदलवणं कठीण होत. या साऱ्या काळातून तावून सुलाखून निघालेले माधुरी आणि जय आता प्रचंड खुश आहेत. व्हॅलेंटाईन डे'वर बोलताना ते म्हणतात, 'आमच्यानंतर देशात आठ ओपन मँरेज झाली. तुम्ही प्रेम केल्यावर जात, धर्म, लिंग अशा गोष्टींना काही महत्व नसते. व्हॅलेंटाईन दिवस तर बहाणा आहे. प्रत्येक जोडप्याने रोजचा दिवस साजरा करण्याची गरज आहे. विशेषतः समाजाने स्वीकारले, प्रेम दिले तर कोणीही किन्नर भीक मागायला जाणार नाही'. 'एक दुजे के लिए' बनलेल्या या जोडप्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !