valentine's Day | पुण्यात हवं प्रेमासाठी हक्काचं कपल्स गार्डन!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 02:49 PM2023-02-14T14:49:47+5:302023-02-14T14:50:11+5:30
मनातील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी एक सुंदरशी जागा असावी...
पुणे : प्रेम ही खूप सुंदर भावना आहे, असं अनेक कवी, शायर आपल्या लेखणीतून मांडत असतात; परंतु खरंच हे प्रेम व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे हक्काचं ठिकाण आहे का? शहरात अनेक ठिकाणी कपल्स सोबत गैरप्रकार होत असतात, प्रेम करणाऱ्या जोडप्यांना विनाकारण त्रास दिला जातो. त्यांना त्यांच्या मनातील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी एक सुंदरशी जागा असावी त्यांना समजून घेणार कोणीही नाही, हीच मागणी घेऊन पुण्यामध्ये राइट टू लव्ह ही चळवळ आठ वर्षांपासून काम करत आहे.
प्रेमीयुगुलांना लग्न करताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, त्यांचे समुपदेशन करणे, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासाठी मदत करणे, याबाबत पालकांशी कसा संवाद साधला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले जाते. ही चळवळ हळूहळू वेग घेत महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकू पाहतेय. राजस्थान, बिहार, आसाम येथूनही प्रेमी जाेडपे आपले प्रश्न घेऊन येतात.
राइट टू लव्ह या संस्थेच्या माध्यमातून २०१८ पासून कपल्ससाठी स्वतंत्र गार्डन असले पाहिजे अशी मागणी केली जात आहे. त्या काळात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसादही दिला होता. प्रत्यक्ष कृती मात्र झाली नाही. गेले अनेक वर्षे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे या मागणीचा पाठपुरावा करत आहे. नाना नानी पार्क असते, चिल्ड्रन्स पार्क असते त्याप्रमाणे कपलसाठी स्वतंत्र गार्डन का नको?, हा आमचा प्रश्न आहे.
कपल्सला बसण्यासाठी, प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक हक्काची जागा हवी. ती नसल्यामुळे प्रेम करणारे जोडपी आज नदीपात्राजवळ बसतात. कुठेतरी प्रेम व्यक्त करण्यासाठी जागा शोधत असतात. हे चित्र फार दयनीय आहे. गुंडगिरी करणारे मुले, पोलिसांकडून त्यांना त्रास दिला जातो, अशा परिस्थितीत ही जोडपी कुठे जाणार.
‘राइट टू लव्ह’
झाडाझुडपात, नदी किनारी, बागेत, अंधाऱ्या आणि सुनसान जागेत, संध्याकाळच्या वेळी बसस्टॉप, रेल्वेस्थानक किंवा सिनेमागृह अशा विविध ठिकाणी, आसपासच्या जगाचा विसर पडलेला, एकमेकांमध्ये गुंग-मग्न होऊन प्रेमात आकंठ बुडालेले दोन जीव दिसले तर उत्स्फूर्तपणे बऱ्या-वाईट अनेक प्रतिक्रिया उमटतात. प्रेमीयुगुलांना बसण्यासाठी हक्काची जागा नसल्याने सार्वजनिक ठिकाणांचा आसरा घ्यावा लागतो. सोबतच अनेक वाईट प्रसंगांचा सामनाही करावा लागतो. अशा घटना टाळण्यासाठी प्रेमीयुगुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी "राइट टू लव्ह" या संघटनेद्वारे कपल गार्डन / पार्कची मागणी करण्यात येत आहे.
प्रिय व्यक्तीबरोबर निवांत वेळ घालवण्यासाठी एकांताची जागा आवश्यक आहे. त्याची कमतरता प्रकर्षाने भासते. पुण्यासारख्या शहरात आणि आसपास फिरण्यासाठी अनेक ठिकाण आहेत. या जागांवर प्रेमीयुगुलांनी कितीही हक्क सांगितला तरी यातल्या बहुतेक ठिकाणी प्रेमीयुगुलांखेरीज कुटुंब, तरुणांचे ग्रुप, प्रौढ नागरिक, विक्रेते असे कितीतरी लोक आसपास भटकत असतात. अशा वेळी एकांत हवा म्हणून बाहेर पडलेल्या प्रेमीयुगुलांसाठी या जागा सोयीच्या ठरत नाहीत. त्यामुळे शहरात कपल गार्डन हवे. त्याची जागा सुरक्षित आणि सुसज्ज हवी. तिथे येणाऱ्या प्रेमीयुगुलांनीसुद्धा स्वत:हून परिस्थितीच भान राखण गरजेचं असेल. एकांतासाठी ती जागा दिलेली असली तरी ती सार्वजनिक जागा आहे, याचं भान ठेवणार पार्क आपल्या शहरात असावे, अशी मागणी राइट टू लव्ह या संघटनेतर्फे करण्यात येत आहे.
- अभिजित कांबळे, टीम- राइट टू लव्ह