आॅनलाइन वस्तूंवर हवी ‘वैध’ माहिती
By admin | Published: January 6, 2017 07:07 AM2017-01-06T07:07:09+5:302017-01-06T07:07:09+5:30
आॅनलाइन बाजारपेठेतूनही उत्पादनाची विक्री करताना प्रत्येक वस्तूवर नियमाप्रमाणे उत्पादनाची सर्व माहिती छापणे बंधनकारक आहे.
पुणे : आॅनलाइन बाजारपेठेतूनही उत्पादनाची विक्री करताना प्रत्येक वस्तूवर नियमाप्रमाणे उत्पादनाची सर्व माहिती छापणे बंधनकारक आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून वस्तूंची विक्री करणाऱ्या अमेझॉनसह सोळा कंपन्या व व्यावसायिकांवर वैधमापनशास्त्र विभागाने खटला दाखल केला आहे.
आॅनलाइन बाजारातून विक्री होणाऱ्या वस्तूंवर वैधमापन कायदा व आवेष्टीत वस्तू नियमांतर्गत उद्घोषणा छापल्या जात नसल्याच्या तक्रारी विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार वैधमापनशास्त्र विभागाने कंपनीच्या खेड येथील गोदामाची तपासणी केली. त्यात वस्तूंवर नियमाप्रमाणे उत्पादनाची माहिती नसल्याने त्यांच्यावर ३२ खटले नोंदविण्यात आले असल्याची माहिती वैधमापनशास्त्र पुणे विभागाचे उपनियंत्रक ध. ल. कोवे यांनी दिली.
नियमानुसार प्रत्येक उत्पादनावर वस्तूचा कमाल किरकोळ दर (एमआरपी), उत्पादकाचे नाव, वस्तूची माहिती, वजन, उत्पादकाचा पत्ता अशा स्वरूपाची माहिती देणे बंधनकारक असते. अशी माहिती नसेल तर संबंधित कंपनी अथवा संस्थेला २५ हजार, तर कंपनीच्या प्रत्येक संचालकाला २५ हजार रुपयांच्या दंडात्मक शिक्षेला सामोरे जावे लागते, असे कोवे म्हणाले.
(प्रतिनिधी)