Chandrayaan-3 : ‘चंद्रयान-३’ मोहिमेत बहुमूल्य योगदान; पुणेकरांचा अभिमान ठरला आदेश फलफले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:04 PM2023-07-18T13:04:19+5:302023-07-18T13:06:02+5:30
आदेश फलफले हा चिंतामणी ज्ञानपीठच्या प्राइड इंग्लिश स्कूलचा अत्यंत हुशार विद्यार्थी
पांडुरंग मरगजे
धनकवडी : धनकवडी, आंबेगाव पठारावरील चिंतामणी ज्ञानपीठाच्या प्राइड इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतलेला माजी विद्यार्थी आदेश फलफले याने इस्रोच्या मिशन ‘चंद्रयान-३’ मोहिमेत बहुमूल्य योगदान दिले. त्यामुळे प्राइडचा हा विद्यार्थी केवळ शाळेचा नव्हे तर अवघ्या पुणेकरांचा प्राइड ठरला आहे. आदेशच्या या योगदानाने चिंतामणी ज्ञानपीठाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आदेश फलफले हा चिंतामणी ज्ञानपीठच्या प्राइड इंग्लिश स्कूलचा अत्यंत हुशार विद्यार्थी. आदेशने उच्चशिक्षण घेताना चौथ्या वर्षाच्या अंतिम सत्रात इस्रोच्या इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टमच्या प्रयोगशाळेत महत्त्वाचे योगदान दिले. तिथे त्याने चंद्रयान-३ मॉड्यूलवर असलेल्या सेन्सर्सच्या चाचणीत सहभाग घेतला तसेच थर्मल व्हॅक्यूम टेस्टिंग या प्रकल्पात योगदान दिले. सध्या सॅटेलाइट डॉकिंगसाठी मॅग्नेटिक रोटेटिंग सिस्टिमवर काम करत असलेला आदेश इस्रोच्या आगामी मिशनमध्येही योगदान देत आहे.
गेल्या एक वर्षापासून आदेश चाचणी, संशोधन आणि विकास उद्देशांसाठी इस्रो केंद्रांना भेट देत होता. सध्या तो ‘पिक्सलस्पेस’साठी स्पेसक्राफ्ट थर्मल इंजिनिअर म्हणून फायरफ्लाय सॅटेलाइट मिशनवर काम करत आहे. ही उपग्रहांची मालिका जून २०२४ मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
''चिंतामणी ज्ञानपीठ प्राइड स्कूलच्या आदेश फलफले या विद्यार्थ्याने देशाच्या संशोधन विकासामध्ये दिलेले महत्त्वपूर्ण योगदान पाहून निश्चितपणे त्याचा खूप अभिमान वाटतो. चिंतामणी ज्ञानपीठ व प्राइड इंग्लिश स्कूलच्या सर्व गुरुजनांच्या वतीने आदेश यास भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. - अप्पा रेणुसे, संस्थापक अध्यक्ष''