सोरटेवाडीच्या सर्जा-राजाला सोपानकाकांच्या पालखीचा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 12:37 AM2018-07-08T00:37:59+5:302018-07-08T00:38:21+5:30
सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे कुटुंबीयांची सर्जा व राजा ही मानाची बैलजोडी संत सोपानकाकांच्या रथासाठी सज्ज झाली आहे. ही बैलजोडी शनिवारी (दि. ७) सासवडकडे रवाना झाली.
सोमेश्वरनगर - सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे कुटुंबीयांची सर्जा व राजा ही मानाची बैलजोडी संत सोपानकाकांच्या रथासाठी सज्ज झाली आहे. ही बैलजोडी शनिवारी (दि. ७) सासवडकडे रवाना झाली.
सोपानकाक ांचा पालखी सोहळा सुमारे १२५ वर्षांपूर्वी आकारास आला. सुरुवातीला भोर्ई समाजातील लोक पालखी वाहून न्यायचे. काही वर्षांनी बैलांच्या सहाय्याने पालखी ओढून नेता येईल, असा रथ तयार केला गेला. सोरटेवाडी येथील कै . बापूसाहेब बाळाजी केंजळे सोपानकाकांच्या समाधीचे सेवेकरी होते. या बापूसाहेबांकडे बैलजोडीचा मान आला. बापूसाहेबांनंतर त्यांचे पुत्र व सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक कै. विठ्ठलराव केंजळे यांनी ही प्रथा सुरू ठेवली. त्यांनी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल काकडे यांच्या सहकार्याने पालखीरथाची आधुनिक व्यवस्था केली. १९८३ मध्ये सोमेश्वर कारखान्याने वैविध्यपूर्ण कलाकुसर केलेला रथ दिला. गेल्या दोन वर्षांपासून सासवड येथील सापोनकाका बँकेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्यातर्फे रथाची सोय करण्यात आली आहे. तसेच २००५ पासून पालखीसोबत नगारा वाहून नेण्यासाठी सोरटेवाडी येथीलच नितीन कुलकर्णी व राजेंद्र कुलकर्णी यांनी बैलजोडी दिली आहे. २००६ मध्ये पालखीला बैलजोडी देण्याची केंजळे कुटुंबीयांची प्रथा खंडित झाली होती. त्यावर्षी पालखीला दुसऱ्याच शेतकºयांची बैलजोडी देण्यात आली, मात्र सासवडहून वाल्हे येथे पालखी पोहोचताच एका बैलाचा मृत्यू ओढवला होता. हा योगायोगाचा भाग असला तरी केंजळे कुटुंबीयांनी रातोरात ७० हजारांची बैलजोडी घेऊन रथाला जुंपली होती. अलीकडे विकास केंजळे, प्रसाद केंजळे व संतोष केंजळे यांनी ही प्रथा अखंड चालू ठेवली आहे.
मंगळवारी (दि. १०) संत सोनानकाकामहाराज पालखीचे सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या पार्श्वभूमीवर आज केंजळे यांनी आपली सर्जा व राजा ही बैलजोडी सासवडकडे रवाना केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद काकडे यांनी बैलांचे पूजन केले. बैलजोडीपूजनप्रसंगी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे व नवनाथ उद्योगसमूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक विशाल गायकवाड, सरपंच दत्तात्रय शेंडकर, डॉ. सोमप्रसाद केंजळे, गौतम काकडे, श्रीपाल सोरटे, कैलास मगर, बाळासाहेब गायकवाड, विकास केंजळे, संतोष केंजळे, प्रसाद केंजळे, ऋचा केंजळे, अरुंधती केंजळे, नितीन कुलकर्णी, रागिणी कुलकर्णी, मोरेश्वर कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, विजय कुलकर्णी, तसेच सोरटेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.