वनांनी घेतला मोकळा श्वास
By admin | Published: May 22, 2017 06:40 AM2017-05-22T06:40:52+5:302017-05-22T06:40:52+5:30
जुन्नर तालुक्यात लोकशासनच्या आंदोलकांनी केलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरूच आहे. रविवारी खोडद व हिवरे गावच्या हद्दीतील किल्ले नारायणगड परिसरातील अतिक्रमणे वनविभागाने बंदोबस्तात काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : जुन्नर तालुक्यात लोकशासनच्या आंदोलकांनी केलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरूच आहे. रविवारी खोडद व हिवरे गावच्या हद्दीतील किल्ले नारायणगड परिसरातील अतिक्रमणे वनविभागाने बंदोबस्तात काढली.
हिवरेतर्फे नारायणगावच्या गट नंबर ४२१ आणि गट नंबर ४३८मध्ये सुमारे ९४ हेक्टर क्षेत्र हे वनक्षेत्र आहे. या क्षेत्रात लोकशासन आंदोलनातील २१ कुटुंबे झोपड्या करून राहात होते. कांदळी येथे ३५ कुटुंबे येथील वनजमिनीमध्ये राहत होते. दोन्ही ठिकाणच्या सर्व झोपड्या काढून साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही अतिक्रमणे काढण्यासाठी ३ जेसीबी, ३ टेम्पो, ४ ट्रॅक्टर व ट्रॉली, २ पोलीस पिंजरे आदी साहित्य मागविण्यात आले होते. परिसरातील झोपड्या काढल्यानंतर लगेचच जल मृदसंधारण कामांतर्गत येथे सलग समतल समपातळीवर चर घेण्यात आले. या चरांमध्ये वनविभागाच्या वतीने झाडे लावण्यात येणार आहेत.
अतिक्रमण कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, जुन्नरचे तहसीलदार महेश पाटील, जुन्नर उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात, आळेफाटा सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, मंचर, चाकण, खेड, पौड आदी भागांतील सर्व पोलीस निरीक्षक, स्पेशल फोर्सचे सुमारे ४० जवान, १० पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक व सुमारे १५० पोलीस कर्मचारी, वनविभागाचे सुमारे ४०० कर्मचारी, तसेच खोडद हिवरे गावचे ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.