वंचित बहुजन आघाडी ही किंचित आघाडी आहे ; आठवलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 02:55 PM2019-04-10T14:55:07+5:302019-04-10T14:57:00+5:30
वंचित बहुजन आघाडी ही किंचित आघाडी असून तिचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचित परिणाम हाेईल अशी टीका रामदास आठवले यांनी केली.
पुणे : वंचित बहुजन आघाडी ही किंचित आघाडी असून तिचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचित परिणाम हाेईल अशी टीका रामदास आठवले यांनी केली. पुण्यात युतीतर्फे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी पुण्याचे युतीचे उमेदवार गिरीश बापट, शिवसेनेच्या प्रदाेत नीलम गाेऱ्हे, आमदार विजय काळे, उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित हाेते.
आठवले म्हणाले, मी अनेक आघाड्या करुन युतीत आलाे आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही किंचित आघाडी असून तिचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा परिणाम हाेणार नाही. राज्याच्या जनतेला तिसरी आघाडी मान्य नाही. तिसऱ्या आघाडीला जनता सत्तेत आणत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा युतीवर परिणाम हाेणार नाही. या आघाडीमुळे हाेणाऱ्या मतविभाजनाचा फायदा हा युतीलाच हाेणार आहे. तसेच देशात पुन्हा माेदींचे सरकार येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. काॅंग्रेस युतीवर जातीयवादी असल्याचा आराेप करत दलित मुस्लिमांची मते मिळवण्याचे काम काॅंग्रेसने केले. त्यामुळे 2014 ला दलित समाज युतीसाेबत आला.
बारामतीबाबत बाेलताना आठवले म्हणाले, मागच्यावेळी महादेव जाणकर बारामतीची जागा 30 हजार मतांनी हरले. त्यावेळी त्यांचे चिन्हा कपबशी हाेते. त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर पाच ते दहा हजारांच्या मतांनी ते निवडून आले असते. परंतु यंदा भाजपाकडून कांचन कुल या निवडणूक लढवत आहेत. यंदा परिवर्तन घडणार आहे. आम्ही यंदा बारामती देखील जिंकू. तसेच महाराष्ट्रात 40 हून अधिक जागा युतीला मिळतील असेही ते यावेळी म्हणाले.