वंचित बहुजन आघाडी 'मविआ'चा घटक नाही, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका
By नितीन चौधरी | Published: August 30, 2023 06:00 PM2023-08-30T18:00:34+5:302023-08-30T18:02:31+5:30
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य...
पुणे : “वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आमचा समझौता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून वंचित आघाडी नाही. इंडिया आघाडीच्या गुरुवारी (दि. ३१) मुंबईत होत असलेल्या बैठकीला निमंत्रण असल्याने आम्ही जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
कोरेगाव भीमा आयोगाच्या साक्षीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेसोबत असलो तरी इंडियाच्या बैठकीसाठी निमंत्रण न आल्यामुळे आम्ही तिकडे जाणार नाही. मात्र, आमची भूमिका शिवसेनेला सांगितली आहे. त्यांच्यासोबत याविषयी चर्चा झाली आहे. आणि आमच्या भूमिकेची वकिली उद्धव ठाकरे इंडियाच्या बैठकीत नक्की करतील, अशी आशा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
आंबेडकर म्हणाले, “इंडियाच्या बैठकीसाठी आमंत्रण का नाही हे काँग्रेसलाच विचारावे लागेल. २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीने ऑफर दिली होती. यावेळी तशीच ऑफर दिली आहे. मात्र, काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद नाही. इंडियाच्या बैठकीसाठी निमंत्रण का देत नाही, महाविकास आघाडीत का घेत नाही, हे त्यांनाच विचारावे लागेल. याबाबत काँग्रेस ज्या दिवशी आम्हाला सांगेल त्या दिवशी आमंत्रण का नव्हते याबाबत त्यांना विचारू.”
बैठकीनंतर राजकीय भूमिका-
तुम्ही इंडियाच्या बैठकीला जाणार का असे विचारल्यानंतर त्यांनी आमंत्रणच नाही तर आम्ही का जावे असा प्रति सवाल केला. शिवसेनेने स्वतःची भूमिका ठरवावी त्यानंतर बैठकीमध्ये त्यांनी आमच्या बाजूने बॅटिंग करावी असे आम्ही मानतो. यासंदर्भात शिवसेनेची चर्चा झाली आहे. बैठकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका लावून धरू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे. त्यात काय होते, त्यानंतर आपली राजकीय भूमिका ठरवू, असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.
हे लुटारू सरकार-
केंद्र सरकारने मंगळवारी गॅस सिलेंडरच्या किमतीत दोनशे रुपयांची कपात केल्याबाबत विचारले असता, हे सरकार लुटारू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती कमी झालेल्या नसताना अचानक दरात कपात का केली हे भाजपने आधी सांगावे. येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील, हे मी आधीपासूनच सांगत आलो आहे. त्यासाठीच हे दर कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
पंकजांना वेगळ्या भूमिका घेण्यास बळ मिळो-
राष्ट्रवादीतील अजित पवार गट सरकारात सामील झाल्यानंतर हल्ली ते नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक करत आहेत याबाबत आंबेडकर यांनी, ते ईडीचेच बोलत आहेत, असा टोला लगावला. तर पंकजा मुंडे या सध्या राज्यातील शक्तिस्थळांना भेटी देत आहेत, याविषयी ते म्हणाले त्यांना वेगळी राजकीय भूमिका घेण्याचे बळ ही शक्तीस्थळे देवोत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.