रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून तोडफोड; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, भारती हॉस्पिटलमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:04 IST2025-01-09T13:03:06+5:302025-01-09T13:04:33+5:30

रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाइकांनी बाह्यरुग्ण विभागात तोडफोड केली

Vandalism by relatives after patient death Case registered against 6 people, incident at Bharti Hospital | रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून तोडफोड; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, भारती हॉस्पिटलमधील घटना

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून तोडफोड; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, भारती हॉस्पिटलमधील घटना

पुणे: रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना भारती हाॅस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सहा नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

याबाबत डाॅ. अंकिता अर्पित ग्रोवर (३६) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम, तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील भारती हाॅस्पिटल रुग्णालयात तेजराज जैन (८६) यांचा उपचारादरम्यान मंगळवारी (दि. ७) मृत्यू झाला. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाइकांनी बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांना रुग्णालयातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षारक्षक तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर, तसेच रुग्णालयातील कर्मचारी सुनील दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस, प्रशांत ओव्हाळ यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. रुग्णालयात आरडाओरडा करून त्यांनी लाकडी स्टुल रुग्णालयातील केबीनच्या काचेवर फेकून मारला. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.

Web Title: Vandalism by relatives after patient death Case registered against 6 people, incident at Bharti Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.