कोयता हवेत भिरकावत वाहनांची तोडफोड; हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:10 IST2024-07-08T13:10:26+5:302024-07-08T13:10:55+5:30
वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेतले

कोयता हवेत भिरकावत वाहनांची तोडफोड; हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हडपसर: फुरसुंगी संकेत विहार परिसरात कोयता हवेत भिरकावत वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्यांना हडपसरपोलिसांनी बेड्या ठोकल्या. करण निवृत्त तांबे ऊर्फ केटी (वय १९, रा. चंदननगर, पुणे), मायकल अशोक साळवे (वय २१, रा. मांजरी, पुणे), रेहान ख्वाजा शेख (वय १८, रा. वडगावशेरी, चंदननगर, पुणे), सागर भीमराव बोर्डे (वय २०, रा. सातवनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेतविहार, फुरसुंगी परिसरात ४ जुलै रोजी हवेत कोयता भिरकावत, लोखंडी शस्त्राने वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वडगावशेरी परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत. पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस पथकाने ही कामगिरी केली.