'पीएमपी' संचालकांच्या कार्यालयात राडा? स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 10:43 PM2021-06-04T22:43:15+5:302021-06-04T23:28:26+5:30
महापौरांच्या सोबत असणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सीईओ राजेंद्र जगताप यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे.
पुणे : पालिकेतील सत्ताधारी भाजपामधील नगरसेवकाने दिलेल्या पीएमपीएमएलच्या संचालकपदाच्या राजीनाम्यामुळे पक्षात वाद उफाळून आला असतानाच पीएमपी कार्यालयात नव्या वादाला तोंड फुटले आहेे. १ जून रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त आणण्याकरिता पीएमपी कार्यालयात गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संगणकात छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार स्वारगेट पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर, महापौरांच्या सोबत असणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्यांनी सीईओ राजेंद्र जगताप यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे.
भाजपाचे नगरसेवक असलेले शंकर पवार हे पीएमपीएमएलचे संचालक आहेत. त्यांनी नुकताच संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देण्यास सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले होते. त्यानुसार हा राजीनामा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून महापौरांकडे आला होता. तो पुढे पीएमपीकडे देण्यात आला. मात्र, १ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महापौरांनी या अर्जाच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत राजीनामा नामंजूर करीत संचालक मंडळाकडे नव्याने देण्याची सूचना केली. त्यावरून सभागृह नेते बिडकर आणि महापौर मोहोळ यांच्यामध्ये बुधवारी जोरदार खडाजंगी झाली होती. हा वाद प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत गेला. पाटील यांनीही राजीनामा मंजूर न झाल्याने संताप व्यक्त केला. त्यांनी बैठकीचे इतिवृत्त (मिनिट्स) मागविले होते.
दरम्यान, बैठकीचे इतिवृत्त घेण्यासाठी महापौर मोहोळ, कैलास त्रिवेदी आणि राहुल ताथवडे हे तिघे पीएमपी कार्यलयात गेले होते. यावेळी तेथे मोठा वाद झाला. शिवीगाळ आणि तोडफोडीपर्यंत प्रकरण केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात दोन्ही बाजूने तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही बाजूंचे जबाब पोलीस नोंदविणार आहेत.
-----
पीएमपीच्यावतीने रखवालदार नाईक आरिफ हुसेन तांबोळी यांनी तक्रार दिली आहे. कैलास त्रिवेदी आणि राहुल ताथवडे या दोघांनी पीएमपी सीईओच्या दालनातील त्यांचा वैयक्तीक संगणक चालू करण्याचा प्रयत्न केला. तसेच औद्योगिक शांतता भंग केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
-----
कैलास त्रिवेदी यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये राजेंद्र जगताप यांच्या सांगण्यावरूनच आपण पीएमपी कार्यालया थांबलो होतो. त्यांनी फोनवरून मिनिट्स देणार नाही असे म्हणत शिवीगाळ केल्याचे आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
-----
शुक्रवारी घडलेल्या या प्रकारावरून राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात घुसून संगणकात होणारी छेडछाड थांबविण्याचा प्रयत्न करणार्या ‘पीएमपी’च्या कर्मचार्यांना महापौर व इतरांकडून कार्यालयाची तोडफोड करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
-----------
शंकर पवार यांच्या राजीनाम्यानंतर पालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपा बिथरलेली असून बैठकीमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. भाजपच्या या दादागिरीची ऑडिओ क्लिप उपलब्ध आहे.
- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
-------
पीएमपी संचालक मंडळाच्या १ जून रोजी झालेल्या बैठकीचे इत्तीवृत्त आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. मी शंकर पवार यांच्या दालनामध्ये बसलो होतो. राजेंद्र जगताप कार्यकायात नव्हते. बैठकीचे इत्तीवृत्त त्यांच्या घरी असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यामार्फत पाठवितो असे सांगितले. दोन कार्यकर्ते त्याकरिता थांबले. मी लगेच पीएमपी कार्यालयातून निघून गेलो.यानंतर दोन तासांनी याठिकाणी पोलिसच आले. या ठिकाणी उपस्थितांनी योग्य भाषेचा वापर केला नाही. राजेंद्र जगताप यांनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. धमकी दिली. ते अशा प्रकारे का वागले मला माहित नाही. महापौरांसोबत वागण्याची ही पद्धत नव्हे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे