वारीत चोपदारांची चौथी पिढी सेवेत
By admin | Published: June 26, 2017 03:36 AM2017-06-26T03:36:24+5:302017-06-26T03:36:24+5:30
जगद्गुरु तुकाराममहाराजांच्या पालखीत मूळच्या परभणीच्या नामदेव निवृत्ती गिराम या चोपदारांची चौथी पिढी सेवेत दाखल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा :
‘सोडिला संसार!
माया तयावरि फार,
धावे चाले मागें मागें,
सुख-दु:ख साहे अंगे,
यानें घ्यावे नाम,
तीसी करणें त्याचे काम,
तुका म्हणे भोळी,
विठ्ठलकृपेची कोवळी!!
जगद्गुरु तुकाराममहाराजांच्या पालखीत मूळच्या परभणीच्या नामदेव निवृत्ती गिराम या चोपदारांची चौथी पिढी सेवेत दाखल झाली आहे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील शिस्त त्यांच्या वागण्यातून दिसत असल्याची प्रचिती येत असल्याने पालखी सोहळ्यातील समाविष्ट दिंड्यांनाही शिस्त लागली असल्याचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी सांगितले.
नामदेव निवृत्ती गिराम यांचे (मूळ गाव पेठ बाभळगाव, ता. पाथरी, जिल्हा परभणी) येथील आहे. सध्या पंढरपूर येथे वास्तव्यास आहे. नामदेव गिराम यांचे पणजोबा गणपतराव गिराम यांनी प्रथम तुकोबाराय पालखी सोहळ्यात चोपदारपदाचे काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्यानंतर नामदेव गणपतराव गिराम, निवृत्ती नामदेव गिराम व आता चौथ्या पिढीत नामदेव गिराम वंशपरंपरेने सोहळ्यात चोपदारांचे काम करीत आहेत.
सकाळी महापूजा झाल्यानंतर व पोपट अण्णा तांबे यांनी तिसरे सिंग वाजविल्यानंतर नामदेव गिराम यांच्या सूचनेनुसारच पालखी सोहळा मार्गस्थ होतो. पालखी मार्गस्थ होताना चोपदार दिंड्या क्रमवारीत लावण्याचे काम मोठ्या जिकिरीचे असते. दिंड्या क्रमवारीत लावल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी विसावा घेण्यासाठी चोपदारांनी दंडक दाखविल्यानंतरसोहळा जागेवर थांबून विसावा घेतला जातो. सायंकाळी विसाव्याच्या ठिकाणी समाजआरतीवेळी कीर्तन, जागर, हरविलेल्या वस्तू यांची माहिती देण्यात येते.