इंदापूरच्या तरुणांना मिळणार विविध प्रकारचे कौशल्यविकास प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:42 AM2018-09-30T00:42:47+5:302018-09-30T00:43:06+5:30
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती : कौशल्यविकासाचे ४५ कोर्स चालू
इंदापूर : सध्याचे युग स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कौशल्यविकासावर आधारित कोर्स सुरू करण्यात आले असून त्या माध्यमातून तालुक्यातील तरुणांना कौशल्यविकास प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर महाविद्यालयातील प्रथम वर्ष ते पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला दर वर्षी एकूण पाच कौशल्य कोर्स करता येतील, तर प्रथमवर्ष ते पदवीपर्यंत तीन कोर्स विद्यार्थ्याला करता येतील. मोबाईल दुरुस्ती, हस्ताक्षर, वेब डिझायनिंग, एम. एस. आॅफिस, स्नेक हँडलिंग अँड अवेअरनेस, लँग्वेज बेसिक, मोडी लिपी, प्रॅक्टिकल नॉलेजे आॅफ अॅग्रिकल्चर, माकेर्टिंग, प्रॅक्टिकल नॉलेज आॅफ बँकिंग, ग्रामीण विकासातील शासकीय धोरणांची माहिती, बर्ड डायव्हर्सिटी, फोटो शॉप, लॅबरोटरी सायन्स, जी.एस.टी., माती परीक्षण, ब्यूटी पार्लर, स्पोकन इंग्लिश, योगा आणि फिटनेस यासारखे ४६ कोर्स महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, संचालक विलासराव वाघमोडे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विजय नारखेडे, डॉ. सुधाकर जाधवर आदी उपस्थित होते.
यांतील 30 कोर्स शंकररावजी पाटील ट्रस्टच्या माध्यमातून इंदापूर महाविद्यालयाने पाच वर्षांसाठी करार केला असून, विद्यार्थ्यांना दर वर्षी यातील एक कोर्स करणे बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची माहिती मिळणार आहे.