भुलेश्वर मंदिरातील गणरायाचे विविध रूपात दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:12+5:302021-09-11T04:11:12+5:30

या विविध रूपातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भुलेश्वर मंदिरास भेट देतात. श्री क्षेत्र भुलेश्वर ...

Various forms of Ganaraya in Bhuleshwar temple | भुलेश्वर मंदिरातील गणरायाचे विविध रूपात दर्शन

भुलेश्वर मंदिरातील गणरायाचे विविध रूपात दर्शन

Next

या विविध रूपातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भुलेश्वर मंदिरास भेट देतात.

श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच गणपतीची विविध रूपे पहावयास मिळतात. पुढच्या बाजूला असणाऱ्या नगारखान्याच्या एका मनोऱ्यात एक उभी असणारी गणपती मूर्ती दिसते. या मूर्तीच्या पोटाभोवती नागबंध आहे. ही मूर्ती चुनखडीमध्ये बनवलेली असून, पेशव्यांचे गुरु ब्रमेंद्रस्वामी यांनी १७ व्या शतकात भुलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळेस या मूर्तीची स्थापना केली आहे. मंदिरावर असणाऱ्या तीनही शिखरांवर गणेश मूर्ती वेगवेगळ्या आसनात आहेत व प्रत्येक मूर्तीच्या पोटाभोवती नागबंध आहे.

पुढे आल्यानंतर मंदिरातील दगडी जिना चढून वर आल्यानंतर डाव्या बाजूला एका खांबावर एक गणेशमूर्ती दिसते. याचे वेगळेपण म्हणजे योगासन केल्याप्रमाणे डाव्या पायावर उभी असून, उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर टेकवला आहे व दोन्ही हाताने उजव्या पायाचा गुडघा धरला आहे. याला शक्ती गणपती म्हणतात.

भुलेश्वर गर्भगृहातील शिवपिंडीचे दर्शन करून बाहेर आल्यानंतर प्रदक्षिणा मार्गाकडे जाताना दक्षिण दरवाज्याजवळ एका खांबावर एक गणेश मूर्ती दोन्ही हात व पाठ छताला लावलेली दिसते. या मूर्तीकडे पाहिल्यावर असे वाटते की, जणु काही या गणेशाने संपूर्ण मंदिराचा भार आपल्या पाठीवर सांभाळला आहे.

पुढे प्रदक्षिणा मार्गावर मकर तोरणे दिसतात, यामध्ये सप्तमातृकांच्या मूर्ती दिसतात. यामध्ये गणेशाचे स्त्री रूपसुद्धा पहावयास मिळते. ही मूर्ती पद्मासन घालून आसनस्थ व चतुर्भुज आहे. तर खाली मुषक वाहन आहे. शेजारीच ब्रम्हा, विष्णू, महादेव , कार्तिकेय वगैरे अशा विविध देवतांच्यासुद्धा स्त्रीरुपातील मूर्ती आढळतात. देवी सहस्त्र नामावलीमध्ये विनायकी , लंबोदरी , गणेश्वरी असा नामोल्लेख आढळतो तर शिल्परत्न ग्रंथात शक्ती गणपतीचा उल्लेख आढळतो. १)भुलेश्वर येथील शिवभक्त दीपक तांबे म्हणाले की, दिवसेंदिवस श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थानकडे भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. पूर्वीच्या काळापासून येथील गणेश मूर्तींच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. येथील गणेश मूर्ती वेगवेगळ्या रूपात आढळतात. विशेष म्हणजे स्री रूपातील गणेश दर्शन फक्त याच ठिकाणी घेता येते. यामुळे गणेश उत्सव काळात हजारो भाविक येथील गणेश मूर्तीचे दर्शन घेतात; मात्र अद्यापही मंदिरे बंद असल्याने अनेक भाविकांना भुलेश्वरचे गणेश दर्शन होणार नाही.

श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात वेगवेगळ्या गणेश मूर्तींचे दर्शन घडते.

Web Title: Various forms of Ganaraya in Bhuleshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.