आषाढीनिमित्त विविध कार्यक्रम

By admin | Published: July 15, 2016 12:30 AM2016-07-15T00:30:48+5:302016-07-15T00:30:48+5:30

आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे येथील विठ्ठलवाडी, शिरूर, दौंड, आळंदी, बारामती, इंदापूर, मंचर,

Various programs on the occasion of Ashadhi | आषाढीनिमित्त विविध कार्यक्रम

आषाढीनिमित्त विविध कार्यक्रम

Next

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे येथील विठ्ठलवाडी, शिरूर, दौंड, आळंदी, बारामती, इंदापूर, मंचर, नारायणगाव, मुळशी, हवेली आदी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी विद्यार्थ्यांची पर्यावरण जनजागृती, दिंड्यांची मिरवणूक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शिरूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील चिमुकल्यांच्या रूपात शहरात अवघा संतांचा मेळा अवतरला. खांद्यावर दिंडी, दिंडीच्या अग्रभागी विठ्ठल-रुक्मिणी, त्यांच्या मागे संतमंडळी व हातात सामाजिक संदेश देणारे, फलक घेतलेले तसेच विठुनामाचा गजर करणारे बालवारकरी असा नयनरम्य बालदिंडी सोहळा शिरूरकरांना अनुभवयास मिळाला. इंग्रजीचे धडे गिरवतानाच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, या हेतूने मंडळाचे अध्यक्ष सदाशिवराव पवार व संचालक प्रकाश पवार यांच्या प्रेरणेतून शाळेने गेल्या चार वर्षांपासून दिंडी सोहळ्याचा उपक्रम सुरू केला. आज शाळेत विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सदाशिवराव पवार व संचालक प्रकाश पवार यांच्यासह सचिव सुरेश पवार, संस्थेचे व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ. विश्वनाथ रिसबुड, जनरल मॅनेजर (निवृत्त) संपत ढवळे, शैक्षणिक सल्लागार, के. बी. सोनवणे, शुभा लाहिरी, सुनीता असोपा, प्राचार्य दिलीप शिंदे, विनायक सासवडे आदी दिंडीत सहभागी झाले.
शहरात नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला बरमेचा यांनी दिंडीचे स्वागत केले. राममंदिर येथे त्यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले. येथील जिजामाता उद्यान येथे दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली. तेथे विद्यार्थ्यांच्या लेझीम व ध्वजपथकांनी उत्कृष्ट प्रात्याक्षिके सादर केली. भजन, अभंग, भारूडचे सादरीकरण व सोबत नृत्य, फुगड्या व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे अवघे वातावरण विठ्ठलमय झाले. नगरसेवक महेंद्र मल्लाव, बाजार समितीचे संचालक प्रवीण चोरडिया, सचिव दिलीप मैड, माजी संचालक शशिकांत दसगुडे,
पालक प्रतिनिधी कापरे, जनार्दन काळे, सुरेश पाचर्णे, जगन्नाथ पाचर्णे आदी मान्यवरही दिंडी सोहळ्यात सहभागी झाले.

भिगवण : कावळा करतो काव काव, अरे माणसा एक तरी झाड लाव, पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिल्या. या वेळी आयोजित पर्यावरण दिंडीत बालगोपाळांनी जलजागृती केली. या वेळी भिगवणकर या बालगोपालांनी काढलेल्या या पालखी सोहळ्याकडे कुतूहलाने पाहत होते.
थोरात स्कूलने ही दिंडी हायस्कूल रोडने काढीत तुळजाभवानी मंदिरापासून मुख्य बाजारपेठेत आणली. विठोबा, रुखमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई यांची वेशभूषा केलेल्या या संतांसोबत पांढरेशुभ्र शर्ट, धोतर आणि टोपी घातलेल्या वारकऱ्यांचा मेळा सोबतीला होता.
खांद्यावर भगव्या पताका आणि हाती टाळ-मृदंग वाजवीत बालवारकऱ्यांनी भिगवण बाजारपेठेतून पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला. या वेळी तुळजाभवानी मंदिर परिसरात दिंडीचा रिंगण सोहळा रंगला. यात वारकऱ्यांप्रमाणे फुगडी खेळून गोल रिंगण करीत विठ्ठलनामाचा गजर केला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात आणि सचिव विजय थोरात यांनी या पालखीचे पूजन केले.
या वेळी आपल्या मुलाला वारकऱ्याच्या वेशात पाहण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. दिंडीचे नियोजन प्रा. मंगल आगवन, सोमनाथ राऊत तसेच सर्व शिक्षकवर्गाने केले होते. (वार्ताहर)

आळेफाटा : विठ्ठल...विठ्ठल.. नामघोष, संतांच्या आकर्षक वेशभूषेतील विद्यार्थी व लेझीम प्रकाराचे सादरीकरण करीत आळेफाटा येथील जे. आर. गुंजाळ इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्ताने पालखी सोहळा साजरा केला.
आळेफाटा येथील या इंग्रजी माध्यम शाळेतील पालखी सोहळ्याचे पूजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गुंजाळ यांच्या हस्ते प्राचार्य ज्ञानेश्वर आरोटे व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत झाले. यानंतर ‘विठ्ठल... विठ्ठल..’ व ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम...’ असा एकच नामघोष विद्यार्थ्यांनी केला. लेझीम पथकाने या वेळी विविध प्रकार सादर केले. पालखीसोबत संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आळेफाटा चौकातील फुगड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दावडी : खरपुडी (ता. खेड) येथील चौधरी पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत सुमारे ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
दिंडीमध्ये बाल वारकऱ्यांनी संत तुकाराम, मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर व निवृत्तीनाथ आदी संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. सजविलेली पालखी, वारकऱ्यांचे टाळ व लेझीम पाहणाऱ्यांना आकर्षित करीत होते. मुलींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन, तर फेटा, टोपी-धोतर घालून गळ्यात टाळ घेऊन अभंग म्हटले. खरपुडीचे माजी सरपंच जयसिंग भोगाडे, दिलीप चौधरी यांनी दिंडीचे स्वागत केले. स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. कैलास चौधरी, मुख्याध्यापक रोहिणी गव्हाणे व शिक्षकांनी दिंडीचे नियोजन केले. आषाढी दिंडीची सांगता खरपुडीतील विठ्ठल मंदिरात भजन व आरतीने झाली.

तळेगाव ढमढेरे : प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशीच्या दिवशी ठिकठिकाणच्या दिंड्या हरिनामाचा गजर करीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार आहेत.
शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या तीरावर वसलेले खेडेगाव विठ्ठलवाडी हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. या गावास नुकताच ‘क’ तीर्थक्षेत्राचा दर्जा शासनाने दिला आहे. येथे गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जिल्ह्यातून अनेक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात.
शिरूर तालुक्यातील भीमा-वेळ नद्यांच्या संगमावर विठ्ठलवाडी हे सांस्कृतिक वारसा लाभलेले साधारण ३२२८ लोकसंख्या असलेले एक टुमदार गाव. सुमारे ३०० वर्षांपूर्वी साक्षात पंढरीच्या पांडुरंगाने संत निळोबारायाच्या स्वप्नात दृष्टांत दिला, की विष्णूच्या डोहात मी आहे. माझी भेट घे, मग पिंपळनेर (ता. पारनेर) येथून निळोबाराय आले. त्यांनी पाण्याबाहेर मूर्ती काढली. त्या वेळी बायजाबाई ढमढेरे या सरदार राणीकडे हे गाव ऐतिहासिक काळापासून इनामी होते. त्यांनी पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने विठ्ठलवाडी येथे केली. तळेगाव ढमढेरेपासून दक्षिणेला रस्त्याच्या दुतर्फा कांदे, ऊस यांनी शेती बहरून गेली आहे. ही शेती हिरवा शालू नेसून गावाला भेट देणाऱ्या भक्तांचे स्वागत करते. अशा प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशीच्या दिवशी परिसरातील शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, राऊतवाडी, बुरुंजवाडी आदी ठिकाणांहून पालख्या दिंड्यांसह हरिनामाचा गजर करीत हजेरी लावतात. तर, जिल्ह्यातून भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी करीत असतात.

वालचंदनगर : येथील पाठशाळा क्रमांक ३ अंजनी बालमंदिर शाळेची एकत्रित दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात वालचंदनगर येथील सर्व पाठशाळांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाद्वारे वास्तव दिंडी सोहळ्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
या दिंडीमध्ये बालचमुंनी संतांच्या वेगवेगळ्या वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला होता. डोक्यावर तुळस, पाण्याची घागर, हातात भगवा पताका, खांद्यावर पालखी, टाळ-मृदंग, संतांचा पेहराव, यामुळे अलंकापुरी ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचा अनुभव या बालचिमुकल्यांनी घेतला. या कार्यक्रमामुळे वालचंदनगरला भक्तिमय स्वरूप आले होते.
वालचंदनगर येथे आज सकाळी नऊ वाजता पाठ शाळेच्या माध्यमातून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अंजनी बालमंदिर क्रमांक १, क्रमांक २ तर पाठशाळा क्रमांक ३ या सोहळ्यात सहभागी झाल्या. पोस्ट कॉलनी येथून हा दिंडी सोहळा सुरू करण्यात आला. वालचंदनगर मुख्य बाजारपेठेत मुख्य चौकात पहिले गोल रिंगण घेण्यात आल्याने संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा व संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव पाहावयास मिळाला. गोल रिंगण झाल्यानंतर बाजारपेठेत अभंग, भारूडे, गवळणी, ज्ञानेश्वरांच्या व तुकाराममहाराजांच्या जयघोषात वालचंदनगर दुमदुमून गेले होते. शेकडो ग्रामस्थांनी या बालचमूंच्या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला. या दिंडी सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजया वाघमारे, पाटील हनुमंत, खरात दीपक, जाधव नंदकुमार, देवरे संतोष, पाटमास भाग्यलता, सांगळे वंदना, शिवगुंडे दीपलक्ष्मी, व्यवहारे मनीषा आदी शिक्षकांनी सहभाग घेऊन नियोजन केले. (वार्ताहर)

Web Title: Various programs on the occasion of Ashadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.