वारकऱ्यांना मिळणार आरोग्य सुविधा
By admin | Published: June 26, 2017 03:36 AM2017-06-26T03:36:57+5:302017-06-26T03:36:57+5:30
आषाढीवारी व पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात पालखी मुक्कामाच्या काळात वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : आषाढीवारी व पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात पालखी मुक्कामाच्या काळात वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सुसज्ज ठेवण्यात आला आहे. सर्वांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.
माने म्हणाले की, २५ ते २९ जून पर्यंत आषाढीवारीचे वारकरी व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री संत सोपानकाका, श्री संत चौरंगीनाथ, श्री संत चांगावटेश्वर व संत निळोबाराय आदिंच्या पालख्या इंदापूर तालुक्यातून मार्गस्थ होणार आहेत. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व त्याअंतर्गत येणारी शासकीय उपजिल्हा रग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालखी मार्गावर एकूण दहा उपकेंद्र आहेत. १२ तात्पुरती औषध उपचार केंद्र आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी ६ औषधोपचार केंद्र आहेत. ५ रुग्णवाहिका आहेत. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी असे ८१ जणांचे मनुष्यबळ आहे, असे सांगून ते म्हणाले की, ३१८ पाण्याचे स्त्रोत आहेत.
त्यामध्ये २२७ विहीरी, ८१ विंधन विहीरी,१० सार्वजनिक टाक्यांचा समावेश आहे. लहान मोठी ६९ उपहारगृहे, १० टँकर भरण्याची ठिकाणे आहेत.
पिण्याच्या पाण्याचे नियमित शुध्दीकरण करुन त्याची चाचणी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. डास निर्मूलनासाठी व अन्य कोणते रोग होवू नयेत या करीता, ग्रामपंचायत स्तरावर औषधे व धूरफवारणी करण्यात येत आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग सुरु करण्यात आले आहेत. मेडीक्लोर, एव्हीएस, एआरव्ही व साथीच्या रोगांवरील औषधे उपलब्ध करुन घेण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील गावांमध्ये कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, धूरफवारणी,कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय व आपत्कालिन सेवा पुरवण्यास सांगण्यात आले आहे. सर्व उपाहारगृहाची स्वच्छताविषयक तपासणी व तेथील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यास सांगितले आहे. टँकर भरण्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. टँकरमधील पाणी शुद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची व टीसीएल पावडरच्या नमुन्याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.
भवानीनगर ते सराटी या पट्ट्यात १७ फिरतीवर वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत. दिंडी प्रमुखांना औषधाचे कीट मोफत देण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्यविषयक शिक्षण व प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे, असे माने यांनी स्पष्ट केले.