एका रंगकर्मी आणि दिग्दर्शकाचे ‘वार्तापत्र’ सोशल मीडियावर ठरलंय चर्चेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:44 PM2018-01-24T12:44:25+5:302018-01-24T12:47:13+5:30
नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एका प्रसिद्ध रंगकर्मी आणि दिग्दर्शकाने सोशल मीडियावर वार्तापत्र सुरू केले असून, ते वार्तापत्र नाट्यवर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. इतर रंगकर्मींकडून हे वार्तापत्र शेअर केले जात आहे
पुणे : यशवंतराव चव्हाण संकुलाला मिळणाऱ्या तारखा, तिकिटावरचा जीएसटी या मुदयांवर आवाज उठवणे एवढेच ‘नाटकवाल्या’चे काम आहे का? हे विषय मांडणे आवश्यकच आहेच; मात्र केवळ तेवढेच आपले काम नाही. एखादा नाटकवाला जर नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर निवडून आला तर त्याची जबाबदारी कोणती? याचे भान देणारे ‘वार्तापत्र’ नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एका प्रसिद्ध रंगकर्मी आणि दिग्दर्शकाने सोशल मीडियावर सुरू केले असून, ते वार्तापत्र नाट्यवर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. इतर रंगकर्मींकडून हे वार्तापत्र शेअर केले जात आहे हे त्यातील विशेष!
सध्या नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीत योगेश सोमण हे नाटकवाले पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नाट्य परिषदेची कार्यपद्धती, संमेलन याबरोबरच नाट्य परिषदेच्या माध्यमातून कोणती पावले उचलली जाऊ शकतात, या मुद्यांचा परामर्श घेणारे ‘वार्तापत्र’ त्यांनी सोशल मीडियावर सुरू केले आहे. या वार्तापत्राला रंगकर्मींची पसंती मिळत आहे. या वार्तापत्राविषयीच्या अभिनव उपक्रमाबद्दल सोमण यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला.
ते म्हणाले, जी वार्तापत्र लिहित आहे, तो माझा विचार आहे. मी जर नियामक मंडळावर निवडून गेलो तर तीन ते चार मुद्यांवर काम करणार आहे. जो प्रत्यक्ष नाट्यव्यवसाय वाटतो, त्याच्या तारखा, तिकिटदर यात मला काही फारसा रस नाही. त्या व्यवसायाचा मी भाग नाही. कायम समांतर रंगभूमीवर काम करीत आलो आहे. नाट्य परिषदेचा तो एक भाग आहे. पाच वर्षांपूर्वी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर असताना हा विचार वेळोवेळी मांडला आहे. त्यासाठी काहीतरी काम केले जाणे आवश्यक आहे. दरवेळी मुंबई नाट्यसंकुलापाशी फिरणारी मंडळी याखेरीज काहीच विचार होत नाही. १३ ते १४ हजार सदस्य राज्यात विखुरलेले आहेत आणि ही मंडळी खर पाहिले तर घटनेनुसार ही नाट्य परिषद चालवित आहेत .त्यांच्यासाठी किंवा आपापले उपक्रम राबविणाऱ्यांपर्यंत नाट्य परिषद किती पोहोचली आहे हा प्रश्न आहे. त्याविषयांशी निगडित प्रश्न वार्तापत्रातून मांडत आहे.या वार्तापत्रातून विविध मुद्यांचा परामर्श घेतला जाणार आहे. नाट्य परिषद आणि नाट्य संमेलन यावर भाष्य केले आहे. आता नाट्य कार्यशाळा घेणाऱ्या आयोजकांशी संपर्क साधून काही कॉमन अभ्यासक्रम तयार करता येऊ शकतो का? हा अभ्यासक्रम नाट्य परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे आपण पोहोचवू शकतो. ज्याप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषेच्या परीक्षा घेते तशा परीक्षा नाट्य परिषदेने शालाबाह्य घ्याव्यात. स्पर्धा परीक्षा भरविणाऱ्या ज्या एजन्सी असतात तशापद्धतीने नाट्यशास्त्राशी संबंधित एका कॉमन अभ्यासक्रमावर परीक्षा घेतल्या तर त्याला एक विश्वासहर्ता येऊ शकेल. शालांत परीक्षांमध्ये कला विषयांना अतिरिक्त गुण द्यायला सुरूवात केली आहे. मात्र तो भोंगळ कारभार होत आहे. राज्य नाट्य स्पर्धेत ज्यांना बक्षिस मिळेल त्यांच्यासाठी गुण वाढवून देणार. पण जर भारत गायन समाज सारख्या परीक्षा नाट्य परिषदेच्या माध्यमातून घेतल्या गेल्या तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. नाट्य क्षेत्रात बरीच तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांची एक समिती नेमून एक अभ्यासक्रम केला तर शासन त्याचे स्वागत करतील. एक किंवा तीन दिवसांच्या कार्यशाळा घेणाऱ्यांचे अद्ययावतीकरण झाले पाहिजे. नाट्य परिषदेच्या कार्यशाळांचे शुल्क परिषदेने निश्चित करावे. संगीत नाटक अकादमीतर्फे तरूण रंगकर्मींनी फेलोशीप दिली जायची. अशा फेलोशीपसाठी अर्ज मागवून पाच नाटककार आणि रंगकर्मींना फेलोशीप द्यावी. आणि नाट्य संमेलनात व्यासपीठ मिळवून देणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध करण्याकडेच अधिक कल
कोथरूड नाट्य परिषदेच्या अध्यक्षांनी नाट्य परिषदेच्या पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध करण्याचे नुकतेच सुतोवाच केले होते.मात्र कोथरूड शाखेचे प्रमुख कार्यवाह असलेले योगेश सोमण यांनी वेगळे पॅनेल स्थापन करून निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने ‘कोथरूड शाखेमध्ये फूट पडली की काय? यावरून अनेकांनी शंका उपस्थित केल्या. परंतु याचा सोमण यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. वेगळे पॅनेल किंवा पॅनेल टू पॅनेल निवडणूक होईल असे चित्र सध्या नाही. २५ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कोण अर्ज मागे घेतील, किती अर्ज उरतील त्याप्रमाणे पॅनेल ठरेल. विरोधात असे कुठलेच पॅनेल नाही. पुणे विभागाची निवडणूक शंभर टक्के बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण काय पद्धतीने काम करणार आहोत आणि कोण निवडून येणार हा महत्वाचा निकष असणार आहे. सगळ्यांचा प्रयत्न आणि मत बिनविरोध करण्याकडेच असल्याचे सांगत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.