पुण्यात 'वरुणराजा'ची जोरदार हजेरी; अचानक बरसलेल्या सरींनी पुणेकरांची उडाली भंबेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 05:35 PM2021-02-18T17:35:58+5:302021-02-18T17:36:47+5:30
पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
पुणे : आता कुठे पुणेकरांची कडाक्याच्या थंडीतून सुटका होण्यास सुरुवात झाली होती. तोच गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.साधारण दुपारी तीन नंतर आभाळ भरून आले होते. त्यानंतर विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा सुरु झाला. अन् काही क्षणातच वरूणराजाचे आगमन झाले. या अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
पुणे शहरातील कात्रज, सुखसागर, वानवडी, वारजे माळवाडी, सदाशिव पेठ, सिंहगड रास्ता, मार्केटयार्ड, चंदननगर, वडगाव शेरी, बिबवेवाडी या परिसरात गारांसह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.
पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाकडून दिला होता.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.