सुरतचा वरुण, पुण्याची अनघा मास्टर माइंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:37+5:302021-03-18T04:12:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डॉरमंट (निष्क्रिय) खात्याचा गोपनीय डेटा मिळवून त्याची विक्री करून त्याद्वारे कोट्यवधी रुपये कमविण्याच्या या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉरमंट (निष्क्रिय) खात्याचा गोपनीय डेटा मिळवून त्याची विक्री करून त्याद्वारे कोट्यवधी रुपये कमविण्याच्या या कटाचा मास्टर माइंड सुरतचा वरुण वर्मा आणि पुण्याची अनघा मोडक हे दोघे असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, औरंगाबादचे राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू तसेच अनघा अनिल मोडक (वय ४०, रा. वडगाव) यांना पोलिसांनी आज अटक केली असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करणार आहे.
सायबर पोलिसांनी काल ८ जणांना अटक केली होती. त्यांच्यातील आणखी तिघांना आज अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेला डेटा हा त्यांनी गुजरात, सुरत व हैदराबाद येथून मिळविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके परराज्यात रवाना केली आहेत.
अनघाला हवे होते अडीच कोटी रुपये
याबाबत पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, अनघा मोडक ही शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करत होती. मात्र, गेल्या काही काळात तिचा व्यवसाय बंद पडला होता. एकमेकांच्या माध्यमातून या सर्वांचा परिचय झाला असल्याचे ते पोलिसांना सांगत आहेत. वरुण याने हा सर्व डेटा मिळवून दिला आहे. चोरीच्या डेटावरून बँक खातेदारांच्या खात्यावरील पैसे काढून देण्याची जबाबदारी अनघा हिने घेतली होती. त्यातून तिने हा डेटा विकत घेणा-यांचा शोध घेत होती. तिला काही जण तसेच भेटलेही होते. मात्र, तिला त्यातून अडीच कोटी रुपये हवे होते.
राजेश शर्मा आणि परमजित संधू यांचा प्रकरणात प्रवेश
डेटा विकत घेऊन तो हॅकर्सच्या मदतीने खात्यातील पैसे मिळविण्यासाठी अनघा अशा काही हॅकर्सच्या संपर्कात होती. त्यातूनच तिची औरंगाबादच्या विशाल बेंद्रेशी ओळख झाली. तो प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. त्याच्या मार्फत राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू यांच्याशी संपर्क झाला. डेटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांपैकी काही पैसे औरंगाबाद येथील एएम न्यूजचे संचालक राजेश शर्मा आणि परमजित संधू या दोघांना हवे होते. त्यासाठी अनघा त्यांच्याकडे अडीच कोटींची मागणी करत होती. मात्र त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्यामुळे २५ लाखांत त्यांना तो व्यवहार करून हवा होता. पैसे घेऊन शर्मा व संधू दोघे पुण्यात आले होते. पोलिसांनी सिंहगड रोडवरील भटेवरा याच्या घरासमोर यातील सर्वांना पकडले. तेव्हा इतरांबरोबरच शर्मा आणि संधू हेही होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आज अटक केली आहे. राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू हे दोघेही सध्या आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यामुळेच त्यांचे न्यूज चॅनेल बंद पडले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. झटपट पैसे मिळविण्याच्या नादात त्यांचा अनघाशी संपर्क झाला होता. तिच्याकडून डेटा घेऊन ते औरंगाबादमधील एकाला पुढे विकणार होते. तसेच हॅकर्सच्या मदतीने या खात्यांमधील पैसा काढून घेण्याचा त्यांचा कट होता.
टोळीतील प्रत्येकाचा रोल होता वेगळा
या टोळीचे मास्टर माइंड वरुण आणि अनघा असून त्यांनीच सर्वांना एकत्र केले होते. वरुणसह इतर तीन इंजिनिअर यापूर्वी गुरगाव येथील एका डेटा स्टोअर करणा-या कंपनीत एकत्र काम करत होते. या डेटाद्वारे खात्यातून पैसे काढण्याचे काम झाल्यावर त्या सर्वांना कोणाला एक टक्का तर कोणाला आणखी काही टक्के मोबदला मिळणार होता.
पोलीस बनले हॅकर्स
डेटा मिळल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून खात्यातील पैसे मिळवण्यासाठी अनघा मोडक हिला हॅकर्सची गरज होती. त्यासाठी ती हॅकर्सचा शोध घेत होती. ही खबर सायबर पोलिसांना मिळाली. सायबर पोलिसांनी स्वत: हॅकर्स बनून तिची भेट घेतली. तिला आपल्या जाळ्यात ओढले. मात्र, इतर आरोपींनाही पुण्यात आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. जोपर्यंत अडीच कोटी मिळत नाही, तोपर्यंत ती सर्वांना पुण्यात एकत्र आणायला तयार नव्हती. हॅकर्स बनलेले पोलीस तिच्याबरोबर सतत थांबून सर्व माहिती वरिष्ठांना पाठवत होते. दोन दिवस हॅकर्स पोलीस अनघाच्या गाडीतून फिरत होते. पण, अधिक दिवस थांबल्यास हे भांडे फुटण्याची शक्यता होती. त्यातून शर्मा आणि संधू हे २५ लाख रुपयांची सोय करून पुण्यात येत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्लॅन आखून त्यांना सर्वांना पकडले. त्याचवेळी दोघांना मुंबई व एकाला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले.
---
या आरोपींकडे मिळालेला २१६ कोटी रुपयांचा डेटा हा केवळ ५ खात्यांशी संबंधित आहे. त्यातील एक खाते सक्रियही आहे. यातील काही आरोपींनी आपण प्रथमच अशा प्रकरणात पडल्याचे सांगितले. तर दोघा तिघांनी आम्ही यापूर्वी अशा प्रकारचे काम केल्याचे सांगितले आहे. त्याचा तपास करण्यात येत आहे. ज्यांची ही खाती आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून त्यांचा जबाब घेण्याचे काम सुरू आहे. यातील आणखी काही सूत्रधार असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार अधिक सुस्पष्ट होईल. यात काही बँकेशी संबंधितांचाही हात असण्याची शक्यता आहे.
- भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त