वरुणराजाची अवकृपा
By admin | Published: July 5, 2017 02:58 AM2017-07-05T02:58:13+5:302017-07-05T02:58:13+5:30
राज्यभरात सर्वदूर बरसणारा पाऊस बारामती तालुक्यावर मात्र रुसला आहे. मागील महिन्यात मृग नक्षत्रामध्ये वरुणराजाने
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : राज्यभरात सर्वदूर बरसणारा पाऊस बारामती तालुक्यावर मात्र रुसला आहे. मागील महिन्यात मृग नक्षत्रामध्ये वरुणराजाने तालुक्यात जोरदार सलामी दिली होती. मात्र, त्यानंतर तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा झाली आहे. पावसाच्या भरवशावर खरिपाच्या पेरण्या करणाऱ्या जिरायती भागाबरोबरच ऊसलागवडी प्रसिद्ध असणाऱ्या बागायती भागातील शेतकरीदेखील पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे.
जूनच्या सुरुवातीला बागायती भागाबरोबरच जिरायती भागातदेखील पावसाने हजेरी लावली होती. पावसाने जोरदार सलामी दिल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने जिरायती भागातील खरीप हंगाम तर बागायती भागातील ऊस लागवडी धोक्यात आल्या आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात बारामती तालुक्यात सुमारे ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती.
सलग पाच वर्षे दुष्काळाचे तोंड पाहिलेल्या जिरायती भागासाठी खरीप हंगाम महत्त्वाचा मानला जातो. बारामती तालुका मुख्यत्वे रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, जिरायती भागातील शेतकरी मोठ्याप्रमाणात पावसाच्या भरवशावर खरिपाची पिके घेत असतात. मागील वर्षी खरीप हंगामात १३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. खरिपामध्ये तालुक्यात मुख्यत्वे बाजरी, मका, सोयाबिन, तूर, सूर्यफूल आदी विविध प्रकारच्या पिकांची लागवडी होतात.
यंदा बाजरीची तालुक्यात सर्वांत जास्त सरासरी ९ हजार ५४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्या खालोखाल मका, इतर तृणधान्ये, कडधान्य आणि तेलबियांच्या लागवडी होत असतात. जिरायती भागाला पावसाने सुरुवातीच्या काळात चांगला हात दिला, तर येथील हंगाम यशस्वी होतो. मात्र, मागील पाच वर्षांपासून जिरायती भागावर पावसाची अवकृपा राहिली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मागील पाचही खरीप हंगाम वाया गेले आहेत.
आलेगाव पागा परिसरात पिके सुकू लागली
लोकमत न्यूज नेटवर्क
रांजणगाव सांडस : आलेगाव पागा (ता. शिरुर) येथे व आसपासच्या परिसरात मूग, चवळी, बाजरी, सोयाबीन पेरले, परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणी केलेली पिके सुकू लागली आहेत.
न्हावरे, आलेगाव शिवशेजारी असणारे तलाव दोन वर्षांपूर्वीच आटल्यामुळे या भागात आजही
पाणी टंचाई आहे. शेतातील ऊस पीक जळून चालले आहे. शेतकऱ्यांना या भागातील दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले आहे. ज्या शेतकऱ्यांना थोडे-फार पाणी आहे, ते दिवस रात्र एक करून पिके जगवित आहे.
चासकमानचे अनेक आवर्तने सुटली; परंतु चारी नं. १९ वरून न्हावरेच्या ओढ्यातून पाणी शेंडगेवाडी तलावात सोडून तलाव भरुन घेतले असते तर उरळगाव, कोळपेवस्ती, तांबेवस्ती, न्हावरे परिसरातील भागात पाणी फिरले असते. या भागातील विहिरी, बोअरवेल यांना पाणी वाढले असते. परंतु हा भाग जाणुनबुजून पाणी न सोडता उन्हाळात, पावसाळ्यात कोरडा पाडला.
- अशोक कोळपे, माजी सरपंच (उरळगांव)
पूर्व हवेलीत प्रतीक्षा दमदार पावसाची
कोरेगाव मूळ : पूर्व हवेली तालुक्यात फक्त पावसाचे वातावरण तयार होत असून, शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे कोरेगाव मूळ, नायगाव, पेठ, सोरतापवाडी, कुंजीरवाडी परिसरातील शेतकरी पावसाची वाट पाहत बसलेला आहे. खरीप हंगामात अल्पप्रमाणात पाऊस झाला. जमिनीत पेरणीयोग्य ओल झाल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र, पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने उगवून आलेली पिकेही जळून गेली. अल्पप्रमाणात पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी पिके जगवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. यासाठी काही शेतकऱ्यांना कुपनलिका व विहिरींना काही प्रमाणात फायदा झाला. अनेक भागात तर पाऊस पडलाच नाही. यामुळे माळरानावरील ज्वारी तर करपली. मात्र, बागायती भागात ज्वारीचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघाले नाही. दरवर्षीपेक्षा कांद्याच्या लागणी तीव्र पाणीटंचाईमुळे कमी झाल्या. मात्र, बाजारभाव समाधानकारक न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला तर वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा पिकवता येतो.कांदा, ऊस यांसारखी पिके घेऊन वर्षभर आर्थिक चणचण कमी करता येते. यासाठी चालू वर्षी समाधानकारक पावसाची गरज आहे. समाधानकारक पाऊस होण्यासाठी शेतकरी ग्रामदेवतेस साकडे घालत आहे.