Pune Rain: थंडी अन् उन्हाळ्याच्यामध्ये वरूणराजाची एन्ट्री! पुण्यात पहाटे पावसाची हजेरी
By श्रीकिशन काळे | Published: March 1, 2024 09:21 AM2024-03-01T09:21:54+5:302024-03-01T09:22:51+5:30
कोरेगाव पार्कला आज सकाळी १.५ मिमी आणि एनडीएला ०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे....
पुणे : पुण्यासह राज्यामध्ये अनेक भागात पावसाने हजेरी लावली. एकीकडे थंडी जात नसताना आणि उन्हाळा सुरू होत नसताना मध्येच वरूणराजाने एन्ट्री मारली आहे. पावसाची ही हजेरी आज आणि उद्या शनिवारी देखील असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कोरेगाव पार्कला आज सकाळी १.५ मिमी आणि एनडीएला ०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी राज्यात पावसाचा अंदाज दिला होता. तसेच पुढील दोन दिवस अजून पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यात काही भागात आज आणि उद्या ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, असा इशारा हवामान विभागाने दिला.
शुक्रवारी म्हणजे आज देखील जळगाव, नाशिक, धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील. तर उद्या शनिवारी विदर्भामधील गडचिरोली , गोंदिया, बुलडाणा, भंडारा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.मराठवड्यात जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि खान्देशातील धुळे, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.
पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका जाणवत होता. त्यानंतर ४८ तासांमध्येच किमान तापमानात वाढ झाली आणि उकाडा जाणवू लागला.
गुरूवारी दिवसभर पुणेकरांना उकाड्याने हैराण केले होते. त्यानंतर सायंकाळी वातावरणात बदल झाला आणि हवेत गारवा आला. शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हलक्या सरी बरसल्या. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा आहे. मार्च महिना सुरू झाला आणि उन्हाळ्याऐवजी पावसाळा सुरू झाला की काय? अशीच भावना पुणेकरांची झाली आहे.