शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदी वसंत कोरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:31+5:302021-07-11T04:09:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी ...

Vasant Korekar as the Chairman of Shirur Market Committee | शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदी वसंत कोरेकर

शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदी वसंत कोरेकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत, ज्येष्ठ असलेले अ‍ॅड. वसंतराव कोरेकर यांची शिरूर आंबेगावच्या नेत्यांनी बिनविरोध निवड करीत न्हावरे गावाला संधी दिली आहे.

शिरूर तालुक्यात घोडगंगा सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ दोन नंबर मोठ्या असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. माजी सभापती शंकरराव जांभळकर यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामा दिला. त्यानंतर सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. जांभळकर यांनी चांगले काम करून बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात सभापतीची माळ पडावी, अशीही इच्छा काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे या शिरूर आंबेगावमधील नेत्यांनी एक मतांने विचार करीत माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान संचालक अ‍ॅड. वसंतराव कोरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. कोरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणूनही त्यांनी चांगले काम केलेले आहे. माजी सभापती शशिकांत दसगुडे, शंकर जांभळकर यांच्याप्रमाणे तेही शिरूर व शिरूर-आंबेगावमधील नेत्यांमधील समन्वय ठेऊन बाजार समितीचे कामकाज चांगले करतील, हा कोरेकर यांच्या निवडी मागचा हेतू असल्याची चर्चा तालुक्यात आहे. निवडणुकीकरिता अर्ज भरण्याच्या मुदतीत यांचा एकमेव अर्ज आल्याने ही बाजार समिती सभापती निवडणूक बिनविरोध करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक प्रकाश पवार, शशिकांत दसगुडे, विश्वास काका ढमढेरे, शंकर जांभळकर, वसंतराव कोरेकर, मानसिंग पाचुंदकर, धैर्यशील ऊर्फ बाबाराजे मांढरे, मंदाकिनी पवार, विकासआबा शिवले, सतीश कोळपे, तृप्तीताई भरणे, विजेंद्र गद्रे, प्रवीण चोरडिया, सुदीप गुंदेचा, बंडू जाधव, राहुल गवारे, संतोष मोरे, छायाताई बेनके, शिरूर बाजार समिती सचिव अनिल ढोकले, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी काळे उपस्थित होते.

चौकट

शिरूर कार्यालय येथे बैठक झाली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा व सर्व संचालक यांचे मत जाणून घेऊन चर्चा केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या उपस्थितीत शिरूर बाजार समितीसाठी ॲड. वसंतराव कोरेकर यांचे नाव जाहीर करण्यात आले.

कोट

शिरूर बाजार समितीची सुरू असलेली विकासाची परंपरा पुढे नेणार आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचे व शेतकऱ्याला फायदा होईल, असे निर्णय घेतले जातील, याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाईल. या निवडणुकीत संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री व कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे या सर्वांचे आभार.

- वसंत कोरेकर, सभापती

Web Title: Vasant Korekar as the Chairman of Shirur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.