Pune MNS: पुण्यात वसंत मोरेंच्या अडचणीत वाढ; शहराध्यक्षपद काढून घेतलं, आता थेट पोलिसांकडून नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:24 PM2022-04-08T16:24:26+5:302022-04-08T16:28:01+5:30
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती
पुणे : राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मी ज्या भागात १५ वर्षांपासून लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झाल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडले आहे. तर साईनाथ बाबर यांची नवीन शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनेचे वरून सरदेसाई, अशा सर्वांकडून मोरे यांना पक्षात सामील होण्याच्या ऑफर आल्या आहेत. परंतु मोरे यांची शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो. वसंत मोरेंच्या निष्ठा अजूनही राज ठाकरे यांच्यासोबत असल्याच्रेही ते म्हणाले होते.
या सर्व घडामोडींमध्ये वसंत मोरे अडकल्याचे दिसू लागले आहे. त्यातच पुण्यात भारती विद्यापीठ पोलिसांकडून वसंत मोरे यांना कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर दोन समाजात धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करु नये अन्यथा आपणावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करम्यात येईल याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमधला मजकूर
वसंत कृष्णाजी मोरे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, पुणे शहर
आपणांस या नोटीसद्वारे कळवण्यात येते की दिनांक दोन एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला. सरद मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे जर काढले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मशिदीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्यात येईल असे वक्तव्य केले आहे.
आपण व आपल्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वरील वक्तव्याने अनुषंगाने दोन समाजात धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करु नये अन्यथा आपणावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करम्यात येईल याची नोंद घ्यावी.