पुण्यात वसंत मोरेंची आज महाआरती, राज ठाकरे येणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 01:25 PM2022-05-07T13:25:10+5:302022-05-07T13:31:13+5:30
गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे माध्यमांना अनरिचेबल होते...
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज्यभरात चार मे रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील अनेक ठिकाणी मनसैनिकांकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आलं होते. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अनेक मनसैनिकांची पदाधिकाऱ्यांची धरपकड देखील करण्यात आली होती.
दरम्यान पुण्यातील मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे नेमके याच दिवशी तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. याच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. राज ठाकरेंनी ठरवलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे टाळण्यासाठी वसंत मोरे तिरुपतीला गेल्याचे देखील आरोप करण्यात आले होते.
परंतु हे सर्व आरोप फेटाळत वसंत मोरे यांनी आज महाआरतीचे आयोजन केले आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील त्यांच्या प्रभागात आज सायंकाळी सहानंतर ही महाआरती होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांच्या या महाआरतीला राज ठाकरे हजेरी लावणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून अनरिचेबल असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यापूर्वी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. मोरे यांनी एक वॉट्सअप स्टेटस ठेवले होते. ज्यामध्ये, तुम्हाला जर विरोध किंवा संघर्षाला सामारे जावे लागत नसेल तर तो रस्ता बदलावा, या आशयाचे स्टेटस मोरे यांनी ठेवले होते.