Vasant More: रोहित पवार कानात काय म्हणाले?, वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 04:46 PM2022-05-15T16:46:15+5:302022-05-15T16:46:28+5:30
शहराध्यक्ष पद गेल्यानंतर वसंत मोरे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत दिसून येत नाहीत.
पुणे- मनसेच्यापुणे शहराध्यक्ष पदावरुन हटविण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांना पक्षात टाळलं जात असल्याचं आज पुन्हा एकदा दिसून आलं आणि त्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्वत:हून दुसऱ्यांदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात शहर पातळीवर मला टाळलं जात आहे. त्यामुळे, आता राज ठाकरे येतील तेव्हाच मी पक्ष कार्यालयात जाणार, असं वसंत मोरेंनी यापर्वी म्हटलं होतं. आता, आज होत असलेल्या पक्षाच्या मेळाव्यासाठी छापलेल्या पत्रिकेतही वसंत मोरेंचं नाव नाही. त्यावरुन, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, रोहित पवारांनी कानात काय सांगितलं, या प्रश्नावरही उत्तर दिलं.
शहराध्यक्ष पद गेल्यानंतर वसंत मोरे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत दिसून येत नाहीत. विशेष म्हणजे भोंगा आंदोलनावेळीही ते तिरुपतीला गेले होते. त्यानंतर, पोलीस आयुक्तांना भेटायला आलेल्या मनसेच्या कोअर कमिटी आणि मोरे यांच्या दुरावा पाहायला मिळाला. पक्षातील कार्यकर्ते आणि आपल्यात संवादच नाही त्यामुळे सुसंवादाचा प्रश्न येत नाही, असं वसंत मोरेंनी म्हटलं होतं. तेव्हा, पक्षात शहर पातळीवर आपल्याला टाळलं जात असल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखवली. आज पुन्हा एकदा, आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षाच्या आयोजित मेळाव्यात ते अर्धा तास उशिरा पोहोचल्याचं दिसून आलं.
मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पक्षाचा मेळावा आणि नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी, साईनाथ बाबर यांनी फोन केल्यानंतरच ते मेळाव्याला आले. पक्षात डावललं जात असून मी अनिल शिदोरेंना फोन करुन याबाबत कळवल्याचंही त्यांनी म्हटलं.
रोहित पवार कानात काय म्हणाले?
एका कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे वसंत मोरे यांच्या कानात काहीतरी बोलल्याचं दिसून आलं होतं. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, वसंत मोरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ''रोहीत पवार मला म्हणाले की, तात्या तुम्ही अतिशय चांगली भूमिका घेतली, तुम्ही मनसेत राहिलात. रोहित पवारांनी मला ऑफर दिलेली नाही, याउलट तुम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेतली ते बरोबर केलं'', असे ते म्हणाले. त्यावर मीही माझं मत मांडलं. ''मी माझी भूमिकाच बदलली नव्हती, मी अगोदरपासूनच सांगितलं होतं की मनसेत आहे आणि मनसेतच राहील'', असा तो किस्सा वसंत मोरेंनी माध्यमांना सांगितला.