वसंत मोरे म्हणाले, "राज ठाकरे जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील!"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:15 PM2022-04-09T15:15:14+5:302022-04-09T15:18:56+5:30
मोरेंचे कार्यकर्त्यांना जिंदाबाद किंवा मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचे आवाहन...
पुणे : 'राज साहेब जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील, असं वक्तव्य पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी मुस्लीम बांधवांना जिंदाबाद किंवा मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचे आवाहन केले आहे. काल कोंढव्यात वसंत मोरें यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मुस्लीम कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात " राज ठाकरे मुर्दाबाद, साईनाथ बाबर मुर्दाबाद, वसंत मोरे जिंदाबाद..." अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोरे म्हणाले, या घोषणा ऐकल्यावर माझ्या मनाला अत्यंत वेदना झाल्या आहेत. तसेच मोरेंनी कार्यकर्त्यांना समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा किंवा वागणूक टाळा असे आवाहनही केले आहे.
गुढीपाढव्याच्या दिवशी राज ठाकरेंच्या (raj thackeray) भाषणातील काही मद्द्यावरून पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे (vasant more) यांनी नाराजी दर्शवली होती. पुण्यातही अनेक ठिकाणी राज ठाकरेंच्या विधानावरून निदर्शने झाली. त्यानंतर पुणे मनसेमध्ये मोठ्या हालचाली होऊन वसंत मोरेंचे शहराध्यक्षपक्ष काढून साईनाथ बाबर यांच्याकडे ते पद देण्यात आले. 'पक्ष म्हणून मी राज ठाकरेंच्या सोबत आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे विधानाचे समर्थन करणार नाही', असंही मोरे म्हणाले होते. त्यानंतर लगेच मोरेंना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
पुणे शहरात मनसेच्या पक्षवाढीसाठी वसंत मोरे यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. तसेच ते पुण्यातील प्रसिद्ध नगरसेेवक आहेत. कोरोनाच्या काळात मोरे यांचे काम कौतुकास्पद ठरले होते. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर अजूनपर्यंत राज ठाकरेंनी त्यांचा फोन घेतला नाही तसेच मेसेजला रिप्लायही केला नाही. गेली दोन दशकांपेक्षा राज ठाकरेंसोबत मी असूनही अशी वागणूक मला पक्षात मिळत आहे, असं म्हणत वसंत मोरे यांच्या अश्रूचा बांध फुटला. मोरेंवरील कारवाईनंतर इतर पक्षांतून त्यांना ऑफर येत आहेत.