“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 09:34 AM2024-05-30T09:34:25+5:302024-05-30T09:39:54+5:30
Vasant More News: जितेंद्र आव्हाड राज्यातील शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत. प्रत्येकवेळी चुका करतात आणि माफी मागतात, अशी टीका वसंत मोरे यांनी केली आहे.
Vasant More News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे महाडमधील क्रांतिस्तंभाजवळ मनुस्मृती दहन आंदोलन करीत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली. मात्र, यावरून वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार वसंत मोरे यांनी जोरदार टीका केली असून, जितेंद्र आव्हाड यांना मानसोपचाराची आहे, असे म्हटले आहे.
वसंत मोरे यांच्या नेतृत्वात पुण्यात वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध नोंदवला. तसेच जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याची मागणीही केली. जितेंद्र आव्हाड यांना मनोविकार तज्ज्ञाला दाखवा. मग शांत होईल. त्यांना मानसोपचाराची गरज आहे, या शब्दांत वसंत मोरे यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.
कारवाई होत नाही, तोपर्यंत जितेंद्र आव्हाड सुधारणार नाहीत
जितेंद्र आव्हाड राज्यातील शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत सुधारणार नाहीत. प्रत्येकवेळी चुका करतात आणि माफी मागतात. जितेंद्र आव्हाडांनी काही पहिल्यांदाच माफी मागितली नाही. बाबासाहेबांचा फोटो फाडला आहे. त्याचे काय परिणाम होणार हे त्यांना महाराष्ट्रात फिरताना जाणवणार आहे, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला. दुसरीकडे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी निषेधाच्या घोषणा देत अजित पवार गटाने ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवले. जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र चवदार तळ्याच्या काठी फाडल्याच्या निषेधार्थ प्रदेश भाजपातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.