‘नादरूप’तर्फे ‘वेध’ नृत्याविष्काराचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:11+5:302021-03-20T04:10:11+5:30

(कलारंग पानासाठी) कोरोनाच्या संकटाचा कला क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाला. नाटकांप्रमाणेच नृत्याचे कार्यक्रमही पूर्णपणे बंद झाले. यातून मार्ग काढत नृत्य ...

‘Vedha’ dance discovery by ‘Nadarup’ | ‘नादरूप’तर्फे ‘वेध’ नृत्याविष्काराचा

‘नादरूप’तर्फे ‘वेध’ नृत्याविष्काराचा

googlenewsNext

(कलारंग पानासाठी)

कोरोनाच्या संकटाचा कला क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाला. नाटकांप्रमाणेच नृत्याचे कार्यक्रमही पूर्णपणे बंद झाले. यातून मार्ग काढत नृत्य संस्थांनी ऑनलाईन सादरीकरणाचा मार्ग निवडत विविध उपक्रम सुरू ठेवले आहेत. याचाच एक भाग म्हणून नादरूप संस्थेतर्फे ‘वेध’ हा नृत्य आणि चर्चासत्राचा कार्यक्रम पार पडला. त्याचप्रमाणे देशातील विविध संतांच्या रचनेवर आधारित नृत्यरचनाही गेल्या काही काळात सादर करण्यात आल्या. ‘फ्युजन’चा ट्रेंड सध्या चलतीत असताना विविध नृत्यरचनांचे एकत्रीकरण करण्याचा अभिनव प्रयोग ‘नादरूप’ने राबवला.

ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे म्हणाल्या,“कोरोनामुळे ३२ वर्षांत पहिल्यांदाच ‘नादरूप’ला इतके दिवस टाळे लावावे लागले. प्रत्यक्ष सराव आणि भेटीगाठी थांबल्या असल्या तरी कला थांबू शकत नाही. त्यामुळे केवळ ऑनलाईन सादरीकरणावर भर न देता विविध विषयांवरील चर्चासत्रेही ‘नादरूप’तर्फे पार पडली. ‘वेध’ हा कार्यक्रम आरुषी मुदगल, पार्श्वनाथ उपाध्ये, सुजाता नायर, शीतल कोळवलकर, संजुक्ता वाघ हे कलाकार दिल्ली, बंगळुरू, पुणे, मुंबई येथून सहभागी झाले. सर्व कलाकारांनी प्रत्येकी चार मिनिटांचा एक व्हिडिओ सादर केला. ‘उत्तम, मध्यम आणि अधम’ या विषयावर संवाद साधला.”

“हा लॉकडाऊन आहे, लॉकअप नव्हे,” हे स्पष्ट करत सकारात्मकतेचा संदेश देण्यासाठी शमा भाटे व त्यांच्या शिष्यांनी विशेष प्रस्तुती डिजिटल माध्यमातून सादर केली आहे. ‘नादरूप’ एकोज (प्रस्तुत) ‘शुभं भवतु’ या विशेष सादरीकरणात ‘कोरोना’शी लढताना, लॉकडाऊन पाळण्यासाठी घ्यावयाची काळजी अत्यंत कलात्मक, आकर्षक व रंजक पद्धतीने मांडत ‘शुभं भवतु’चा प्रतिध्वनी ‘नाद-रूप’च्या नृत्य कलाकारांच्या माध्यमातून देण्यात आला.

जगाला विळखा घालून बसलेल्या या ‘कोरोना’तून सुटण्यासाठी ‘लॉकडाऊन’चे नियम काटेकोररित्या पाळणे आवश्यक आहे. परंतु काही लोक याकडे कानाडोळा करत नियमांचे उल्लंघन करतात. हे नियम पाळणे किती महत्वाचे आहे, ही शिक्षा नसून संधी आहे, हेच आकर्षक व रंजक पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे शमा भाटे यांनी सांगितले.

दिल्लीच्या डॉ. अर्शिया सेठी यांच्या हाच संदेश देणाऱ्या इंग्रजी कावेतेच्या आधारे ही कलाकृती रंगते. यात माझ्या आठ शिष्यांनी सादरीकरण केले आहे. परंतु हे सर्व सदरीकरण लॉकडाऊनचे नियम पळत आपापल्या घरी प्रत्येकीने व्हिडीओ रेकॉर्ड केले. नंतर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच त्याचे संकलन, साऊंड आदि आवश्यक पूर्तता करून ही संपूर्ण कलाकृती आपल्या समोर सादर करण्यात आली आहे. पारंपारिक कला नव्या डिजिटल माध्यमाशी, तंत्रज्ञानाशी सांगड घालत आहे. त्यामुळेच केवळ चार दिवसांमध्ये हे संपूर्ण सादरीकरण आम्ही उभे करू शकलो. आपापल्या घरी कलाकार असल्याने त्यांना सांगीतिक साथसंगत उपलब्ध असणे अवघड होते. त्यामुळे टाळ्यांचे ताल, पढंत यावर हे सादरीकरण होत आहे. त्यामुळे कमीत कमी संगीतावर आधारित नृत्यकलाकृती हे देखील याचे एक वैशिष्ट्य आहे. या कलाविष्कारातील मूळ कविता डॉ. अर्शिया सेठी यांची असून नृत्य दिग्दर्शन शमा भाटे, सहाय्यक अमीरा पाटणकर यांचे आहे. यात अमीरा, अवनी, शिल्पा, रागिणी, शिवानी, भार्गवी, नीरजा, ईशा यांनी नृत्य सादरीकरण केले आहे. कविता अभिवाचन शिल्पा भिडे व निखील रवी परमार यांनी केले आहे. चैतन्य आडकर यांचे संगीत असून साऊंड / रेकॉर्डिंग ईशान देवस्थळी यांचे तर संकलन अपूर्व साठे यांनी केले आहे.

Web Title: ‘Vedha’ dance discovery by ‘Nadarup’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.