वेध विलिनीकरणाचे : औताडे -हांडेवाडी २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:41+5:302021-03-25T04:11:41+5:30
औताडे-हांडेवाडीतील गावकऱ्यांची मागणी दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांपैकी तुलनेने सर्वांत कमी ...
औताडे-हांडेवाडीतील गावकऱ्यांची मागणी
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांपैकी तुलनेने सर्वांत कमी अतिक्रमण हे औताडे-हांडेवाडीत आहे. त्यामुळे या भागाचे तातडीने योग्य नियोजन केल्यास गावाचा बकालपणापासून बचाव होईल अशी गावकऱ्यांची धारणा आहे.
औताडे-हांडेवाडीमधील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, खराब रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातून निघणाऱ्या धुळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हांडेवाडी ते सिंप्लीसिटी रोडची अवस्था तर अक्षरश: जीवघेणी ठरत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून अनेक वाहने वाहून गेलीत. आजही अनेक अपघात त्या ठिकाणी घडतात, तरी प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
हा रस्ता एकदा दुरुस्त केला होता. परंतु, आता तो पुन्हा खराब झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे. गावातील मुख्य रस्त्यावर दिवसभर वाहतूककोंडी झालेली असते. महापालिकेत विलिनीकरण झाल्यास शिस्त लागेल, असे गावकऱ्यांना वाटते.
गावात अतिक्रमणांची संख्या नगण्य असली, तरीही मुख्य रस्त्यालगत अनेक पानटपऱ्या, दुकाने बेकायदा जागेवर उभी राहिली आहेत. महापालिका आल्यानंतर ती काढली जातील, अशी अपेक्षा गावातील तरुणांनी व्यक्त केली. गावात विरंगुळा केंद्र नाही. उद्यान नाही, खेळण्यासाठी मैदान नाही. गावठाणाची ७० एकर जागा असूनही गावात विकासकामे होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
कोट
“गावातील अंतर्गत रस्ते अतिशय खराब असून, काही रस्ते असे आहेत की तिथून पायी चालणेही कठीण आहे. तसेच पिण्याच्या पाण्याला महापालिकेने प्राधान्य द्यावे.”
-उल्का कैलास हांडे, गृहिणी
कोट
“ग्रामपंचायतीमार्फत तुटपुंजा आणि तोही दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत तातडीने उपाययोजना करा.
-पूजा शरद हांडे, गृहिणी
फोटो ओळ - औताडे-हांडेवाडीमधील स्मशानभूमीसाठी पुरेशी जागा असून नियोजनपूर्वक बांधकाम करण्यात आले आहे.