वेध विलिनीकरणाचे : नांदेड २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:42+5:302021-03-14T04:10:42+5:30
नांदेडमधल्या आजीबाईंची प्रतिक्रिया; महापालिकेकडून मोठी अपेक्षा दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आमचं नांदेड अजूनही पूर्वीसारखंच खेडं आहे ...
नांदेडमधल्या आजीबाईंची प्रतिक्रिया; महापालिकेकडून मोठी अपेक्षा
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आमचं नांदेड अजूनही पूर्वीसारखंच खेडं आहे फक्त आता मोकळ्या जागा गेल्या,” अशी मिस्कील प्रतिक्रिया गावातील एक आजीबाईंनी ʻलोकमतʼबरोबर बोलताना दिली.
नांदेड गावात क्रीडांगण, मल्लनिस्सारण प्रकल्प, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, उद्यान आणि बस टर्मिनलसाठी या प्रकल्पांसाठी जागा मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
नांदेड फाट्यावरील सिंहगडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मुख्य चौकात वाहतूक कोंडी होते. त्यातून अपघातही घडले आहेत. तीच अवस्था गावातील मुख्य रस्त्याचीही आहे. एकाच वेळी दोन चारचाकी गाड्या निघणे कठीण आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली आहेत, परंतु तेथेही अतिक्रमण आहे. गावातील वेगवेगळ्या भागात विजेचे खांब उभारले, परंतु त्या खांबांवरील दिवे बंद आहेत. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने रात्रीच्या अपघात किंवा चोरी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारतात.
पुणे महानगरपालिकेत जेव्हा अकरा गावांचा समावेश केला गेला तेव्हा आम्हालाही समावेशाची आशा होती. पण आज त्या अकरा गावांची अवस्था काय आहे? त्यांच्या पायाभूत सुविधांचे आणि इतर प्रश्न सुटले का? आमच्या शेजारी शिवणे गाव आहे, जे याआधी महानगरपालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांमध्ये होते. अजूनही शिवणेतील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत, अशी तक्रार करतानाच पालिकेकडून मोठी अपेक्षा असल्याचेही गावकरी नमूद करतात.
कोट
“पाणी मुबलक आहे, पण जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने त्या पाण्याचा उपयोग काय? आमचं गाव स्वयंपूर्ण असून गावाच्या विलिनीकरणाने आमच्या गावचंच नुकसान होणार आहे.”
- मयूरी कारले, नागरिक
कोट
“गावातील कचरा व पाण्याच्या समस्या सुटणे गरजेचे आहे. महानगरपालिका आमच्या समस्या सोडवणार असेल तर आम्ही सरकारच्या निर्णयाचे नक्की स्वागत करू.”
-मारुती मरगळे, सामाजिक कार्यकर्ते
कोट
“यापूर्वी, समाविष्ट झालेल्या अकरा गावांसारखी स्थिती आमची होऊ नये. कचरा व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याची समस्या ही आमची मुख्य अडचण आहे.”
-विजय दारवटकर, सामाजिक कार्यकर्ते
फोटो ओळी:
शिवणे-नांदेड या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ, नदीकिनारी गावातील कचरा टाकला जातो. यामुळे भटक्या जनावरांचा वावर वाढतो. दुर्गंधीमुळे अनारोग्य निर्माण होते.