वेध विलिनीकरणाचे : नऱ्हे १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:19 AM2021-03-04T04:19:39+5:302021-03-04T04:19:39+5:30

नऱ्हे ग्रामस्थांचा सवाल दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कचऱ्याच्या प्रश्नाबरोबरच अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा आणि वाढती झोपडपट्टी अशा ...

Vedha Merger: Narhe 1 | वेध विलिनीकरणाचे : नऱ्हे १

वेध विलिनीकरणाचे : नऱ्हे १

googlenewsNext

नऱ्हे ग्रामस्थांचा सवाल

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कचऱ्याच्या प्रश्नाबरोबरच अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा आणि वाढती झोपडपट्टी अशा समस्यांचा सामना करणाऱ्या नऱ्हे गावातील रहिवाशांना विलिनीकरणानंतर या समस्या सुटतीलच, यावर विश्वास ठेवणे कठीण जातेय. चांगल्या सुविधा उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. नव्या रचनेत या समस्यांचे काय, असा त्यांचा सवाल आहे.

पुणे शहरालगतच्या अन्य गावांमध्ये कचरा निर्मूलन होत असले, तरीही सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या नऱ्हे गावात कचरा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावात वाढत असलेली झोपडपट्टी आणि अंतर्गत रस्ते या विषयांना ग्रामस्थ तोंड देत आहेत.

सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या नऱ्हे गावात दररोज २० टन कचरा निर्माण होतो. तो उचलण्यासाठीची ग्रामपंचायतीची यंत्रणा तोकडी असल्याने कॅनॉल परिसर आणि गावाला जोडणाऱ्या शिवणे-नऱ्हे पुलाजवळ कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. त्यावर भटक्या जनावरांचा वावर असतो, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण मिळते. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना या कचऱ्यामुळे साथरोगाने थैमान घातले तर जबाबदार कोण, असाही प्रश्न नागरिक विचारतात. ग्रामपंचायतीची वार्षिक उलाढाल १५ कोटींची असूनही मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याबाबतही तीव्र नाराजी आहे. मुख्य रस्त्यावर मोठी रहादारी असते. नेमका तोच रस्ता अजूनही अपूर्ण असल्याने अपघाताची भीती नागरिकांना आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून गावात सव्वातीन कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. गावात झोपडपट्टीवासीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधांची वाणवा आहे. सरकार पुनर्वसन करणार की नाही, अशा चिंतेत झोपडपट्टीवासीय दिवस पुढे ढकलत आहेत.

*कोट*

याआधी जी अकरा गावे महानगरपालिकेत समाविष्ट झाली त्यांची परिस्थिती आजतागायत सुधारलेली नाही. त्यामुळे सरकारने आमच्या गावाचे विलिनीकरण करुन दुर्दशा करु नये. ग्रामपंचायतीमार्फत गावात अनेक विकासकामे सुरू आहेत.

-सागर भूमकर, उपसरपंच

---------

रस्त्यांवर अवजड वाहनांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. गाड्यांचे कसेही पार्किंग केले जाते. संध्याकाळी नवले पूल आणि गणपती चौकात वाहतूककोंडी होत असल्याने ही दररोजची डोकेदुखी ठरत आहे.

-संतोष खाडे, स्थानिक

Web Title: Vedha Merger: Narhe 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.