वेध विलिनीकरणाचे : सूस गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:12 AM2021-02-27T04:12:33+5:302021-02-27T04:12:33+5:30
............................... धरण उशाला आणि कोरड घशाला ............... सूसवासीयांकडून स्वागत अपेक्षा ठेवूनच; नव्या व्यवस्थेत तरी प्रश्न सुटण्याची आशा दीपक ...
...............................
धरण उशाला आणि कोरड घशाला
...............
सूसवासीयांकडून स्वागत अपेक्षा ठेवूनच; नव्या व्यवस्थेत तरी प्रश्न सुटण्याची आशा
दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पिण्याच्या पाण्यासह अन्य मूलभूत सुविधांची समस्या भेडसावणाऱ्या सूस ग्रामस्थांनी विलिनीकरणाचे स्वागत केले आहे ते महापालिकेकडून काही अपेक्षा ठेवूनच. नव्या व्यवस्थेत परिस्थिती सुधारते का ते बघू, असा ग्रामस्थांचा विचार असल्याचे दिसते.
आमच्या तालुक्यात मुळशी धरण असूनसुद्धा आम्हाला पिण्याचं पाणी मिळत नसेल तर त्या धरणाचा उपयोग काय? हा प्रकार म्हणजे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ असा संताप व्यक्त करत सूस ग्रामस्थांनी महापालिका विलीनीकरणाचे स्वागत केले.
साधारणतः ५७ हजार लोकसंख्या असलेल्या सूसगावात अजूनही चांगल्या सुविधांची वानवा आहे. पिण्यासाठी पाणी नसून या लोकसंख्येला दररोज फक्त ५० हजार लिटर पाणीपुरवठा होतो. सूसगावात पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने नागरिकांनी, पाण्यासाठी होणारे प्रचंड हाल बोलून दाखविले.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे गावातील नागरीकरणही वाढत असून गावातील कचराप्रश्नही ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीद्वारे कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेस कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले असून, कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीत लोक कचरा न टाकता रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले असते.
गावातील सांडपाण्यासाठी भूमिगत गटार प्रकल्पाची सोय करण्यात आली असून, त्याचेही काम सुरू आहे. मात्र एसटीपी केंद्रासाठी जागाच नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
अडचणीचा मुद्दा म्हणजे गावात प्राथमिक शाळा, स्मशानभूमी आणि अंगणवाडीसाठी जागाच उपलब्ध नसल्याचे स्थानिक सांगतात. सध्या शाळा पत्र्याच्या खोलीत भरते. चांगल्या शिक्षणाची सोय नसल्याने पालकांना मुलांना महागड्या खासगी शाळेत पाठवावे लागत आहे. स्मशानभूमीसाठी जागाच नसल्यामुळे अंत्ययात्रा न्यायची कुठे, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
.......
कोट
............
गेल्या दहा वर्षांत सूसगावात मोठा कायापालट झाला. आधी लोकसंख्या कमी असल्याने संसाधनांवर ताण कमी होता. आता वाहतूक वाढली. अतिरिक्त लोकसंख्या वाढल्याने लोकांनी एकत्र येत घरखरेदी केली. आता सूसगां महापालिकेत जात असेल तर आधी पायाभूत सुविधांचा विकास व्हावा हीच अपेक्षा.
*नारायणराव चांदेरे*
माजी सरपंच, सूसगाव
......................
पुणे महापालिकेतील समावेशाचे आम्ही स्वागत करतो. महापालिकेत आल्यानंतर आमच्या गावातील पाणीप्रश्न सुटावा हीच आमची मागणी आहे!
-अपूर्वा निकाळजे, सरपंच, सूसगाव
.......................
सगळ्यात त्रासदायक प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे. महापालिकेत जाण्याने पाणीप्रश्न सुटणार असेल तर आमची हरकत नाही.
*दिशा ससार*
उपसरपंच, सूसगाव
(उद्याच्या अंकात : सूसगाव भाग २)