वीर-सासवड रस्त्याची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:13 AM2018-08-20T01:13:05+5:302018-08-20T01:13:25+5:30
अपघातांत मोठ्या प्रमाणात वाढ; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
परिंचे : वीर-सासवड रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असून अपघातांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यादववाडी, परिंचे, राऊतवाडी, वीर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. श्रीक्षेत्र वीर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवताना भाविकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी या रस्त्यावरील अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र, तरीही गेल्या ४ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची तसदी घेतली नाही.
यादववाडी येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या वर्षी साईडपट्ट्यांवरील पाणी जाण्यासाठी उतार केले जातात तेही करण्यात आले नाहीत. रस्त्यांची दुरवस्था होण्याचे हे प्रमुख कारण असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
बापदेव घाट ते वीर हा चार कोटी रुपयाचा रस्ता मंजूर असून काही ठिकाणचे काम सुरू झालेले नाही. पावसाळा संपताच या रस्त्याचे काम सुरू करणार असून, कांबळवाडी ते वीर हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. परिसरातील खड्डे कामगार पाठवून तातडीने तात्पुरते बुजवण्याचे काम करणार आहे.
- दिनेश गायकवाड,
अभियंता, पुरंदर शाखा