पुण्याच्या मार्केटयार्डमधील भाजीपाला व फळे विभाग २१ व २५ ऑगस्टला सुरूच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 01:42 PM2020-08-19T13:42:15+5:302020-08-19T13:42:57+5:30
आडते असोसिएशन भूमिकेला पाठिंबा पण बंदमध्ये सहभागी नाही: विलास भुजबळ
पुणे : बाजार आवारातील व्यापार देखील नियमन मुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य,बाजारसमिती संघाने शुक्रवारी (दि.२१) व पुणे मर्चंट चेंबरच्या माध्यमातून अन्न धान्य व गुळ भुसारच्या राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी मंगळवारी (दि.२५ ) शेतमालाच्या सर्व बाजार पेठा नियमन मुक्तीच्या विरोधामध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वरील दोन्ही संस्थांनी बाजार बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयास श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचा संपूर्णपणे पाठिंबा आहे.परंतु, नाशवंत शेतमालाचा व्यापार असणाऱ्या आम्हा आडत्यांचा व्यापार सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे.एक दिवस सुद्धा बाजार बंद ठेवल्यास नाशवंत मालाचा संपूर्ण व्यापार हा पूर्णपणे विस्कळीत होतो.मार्केट यार्डातील भाजीपाला व फळे विभाग २१ व २५ ऑगस्टला सुरूच राहणार असल्याचे आडते असोसिएशन अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.
याबाबत असोसिएशने काढलेल्या पत्रकात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने वरील वस्तूंचा व्यापार करणाऱ्या सर्व शेतमालाच्या व्यापारावरील नियमन मुक्तीचा निर्णय घेवून त्या प्रमाणे आदेश काढलेला आहे. हे आपणा सर्वांना माहित आहे.त्यानुसार आडते असोसिएशनच्या वतीने २० जानेवारी २०१९ रोजी पूर्वीच्या युती सरकारकडे ज्या प्रमाणे बाजार आवारा बाहेर नियमन मुक्ती केलेली आहे.त्याच प्रमाणे मुख्य बाजार आवारात देखील नियमन मुक्ती करण्याची मागणी केलेली आहे. त्याच प्रमाणे १० फेब्रुवारी २०२० रोजी सध्याच्या आघाडी सरकारकडे सुद्धा लेखी पत्राद्वारे बाजार आवारा मध्ये सुद्धा नियमन मुक्ती करावी अशी मागणी केलेली आहे.
सध्या शासनाने काही दिवसांपूर्वी अन्न धान्य व भुसार या शेतमालाची सुद्धा नुकतीच बाजार आवारा बाहेर नियमन मुक्ती केल्याचे आदेशानुसार जाहीर केलेले आहे.त्याच प्रमाणे मुख्य बाजार आवारा मध्ये सुद्धा नियमन मुक्ती करावी. सदर मागणीचा पाठपुरावा आडते असोसिएशनच्या माध्यमातून आपण शासन दरबारी सातत्याने करत आहोत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
त्यामुळेच गुलटेकडी मार्केट यार्डातीलफळे,भाजीपाला,कांदा-बटाटा,केळी व पानाचा व्यापार हा पूर्णपणे सुरू राहील असे विलास भुजबळ यांनी स्पष्ट केले