फळबागांसह भाजीपाला पिकांना फटका
By admin | Published: May 15, 2017 06:43 AM2017-05-15T06:43:03+5:302017-05-15T06:43:03+5:30
वादळी वाऱ्यासोबत आलेल्या पावसाने तालुक्याच्या पूर्व हवेलीमध्ये शनिवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : वादळी वाऱ्यासोबत आलेल्या पावसाने तालुक्याच्या पूर्व हवेलीमध्ये शनिवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक लहान-मोठे वृक्ष उन्मळून पडले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युतवाहक तारा तुटल्या असून, विद्युत खांबही पडल्याने हवेलीच्या पूर्व भागातील अनेक गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला.
लोणी काळभोरसह थेऊर, कोलवडी, मांजरी खुर्द, नायगाव, पेठ, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, वळती, तरडे, शिंदवणे, हिंगणगाव, अष्टापूर, भवरापूर या भागांमध्ये अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. गारांच्या पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असून, डाळींब, शेवग्याची झाडे, केळीच्या बागा उन्मळून पडल्या आहेत.
रस्त्यालगतची अनेक झाडे पडल्याने बऱ्याच ठिकाणी वाहतुकीला अडथळा झाला आहे. लोणी काळभोर, नायगाव, पेठ भागातील अनेक घरांच्या भिंती कोसळल्या असून, फुलशेतीसह, फळबागा व पॉलिहाऊस व शेडनेटचे मोठे नुकसान झाल्याचे नायगावचे उपसरपंच राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.
पालक, मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी, दोडका, भोपळा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ऊस, मका व वेलवर्गीय पिके भुईसपाट झाली आहेत. अनेक ठिकाणी पॉलीहाऊस व शेडनेटचेही मोठे नुकसान झाले आहे. पॉलीहाऊसचे कागद फाटून उडाले असून लोखंडी अँगल्स वाकडे झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कुंजीरवाडी येथील युवा शेतकरी रामदास कुंजीर यांची पपईची दोनशे झाडे भुईसपाट झाली आहे. विजय कुंजीर, पांडुरंग कुंजीर,
राघवदास चौधरी, संजय चौधरी, नंदकुमार चौधरी, दीपक चौधरी, किसन चौधरी, राजेंद्र हगवणे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लोणी काळभोर येथील टाक्याचे माळ परिसरात वास्तव्यास असलेल्या नंदीवाले समाजाच्या वस्तीला याचा सर्वांत जास्त फटका बसला असून येथील अनेक घरांवरचे पत्रे उडून गेल्याने त्यंचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर व माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर यांनी भेट देऊन रहिवाशांची चौकशी केली.