बारामती शहरात भाजीपाला लागवड यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:05 AM2018-09-01T00:05:51+5:302018-09-01T00:06:28+5:30

६० गुंठे जमिनीत करतोय शेती : तरुणाने खासगी नोकरीपेक्षा मिळवला चांगला रोजगार

Vegetable cultivation successful in Baramati | बारामती शहरात भाजीपाला लागवड यशस्वी

बारामती शहरात भाजीपाला लागवड यशस्वी

Next

बारामती : बारामती शहराची ओळख विकसित शहरांमध्ये होते. शहराचा विकास होताना येथील जमिनीच्या किमती झपाट्याने वाढल्या. अनेकांनी जमिनी विकून इमारती उभ्या केल्या. अमाप पैसे मिळविले; मात्र शहरातील जमीन न विकता तीवर भाजीपाला लागवड करून येथील तरुणाने चांगले आर्थिक उत्पन्न मिळविले आहे. भरशहरात केलेली शेती शहरवासीयांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

तरुण नोकरीच्या मागे न लागता अत्याधुनिक शेती जिद्द, कष्टाच्या जोरावर नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळवू शकतात. याबाबत तरुण शेतकरी राहुल जाधव यांनी तरुणांना संदेश दिला आहे. त्यांनी बारामती शहरात फुलवलेली बाग नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. शहराच्या जवळचा बराचशा भागात इमारती उभारल्या, बंगले झाले, व्यावसायिक गाळे झाले. पण, या सगळ्यात अगदी शहराच्या मध्य भागात ६० गुंठे जमिनीत राहुल यांनी वेगळी वाट निवडली. त्यामध्ये त्यांनी ३० गुंठे अर्जुना जातीचे कारले व ३० गुंठे बायटर ग्राउंड पल्लवी जातीचा दोडका हे वाण लावले आहे. या दीड एकर क्षेत्रात त्यांनी जुलै २०१८मध्ये दोडका, कारले याची लागवड केली. यासाठी जाधव यांना १ लाख रुपये खर्च आला. त्याचप्रमाणे सर्व पिकाला ठिबक सिंचन केल्याने कमीत कमी पाणी लागते. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विंधनविहीर घेतली आहे. त्यानंतर दीड महिन्याने फळे लागली. पहिली तोडणी केली. सुरुवातीला पीक कमी होते; पण आता आठवड्यातून दोन वेळा दोडका व कारल्याची तोडणी करावी लागते. साधारण ४०० किलो दोडका व ३५० किलो कारले होते. याची विक्री पुण्याच्या बाजारात दर बघून केली जाते. तसेच, पुण्यात दर न मिळाल्यास बारामतीत मार्केटमध्ये भाज्या लिलावाला जातात. आठवड्याला सुमारे १५ हजार रुपये एवढी पट्टी मिळते. म्हणजे महिन्याला सरासरी ६० हजार रुपये उत्पन्न मिळते. दर वर्षाला खर्च वजा जाता नोकरदारापेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे.

माळेगाव रोड व त्या भागातील शेतकरी उसासारख्या पिकाला दीड वर्ष वाट बघत बसतात. त्यापेक्षा दोडका, कारले अशा पिकांची लागण करून २ महिन्यांत उत्पन्न सुरू होते. दोडका साधारणपणे ६ महिने व कारले १० महिन्यापर्यंत फळ देते; पण त्यासाठी कष्टाची मात्र तयारी हवी. सुशिक्षित असतानादेखील आधुनिक शेती व मेहनतीच्या जोरावर नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळतात, असे राहुल सांगतात.

ठिबक सिंचन केल्यामुळे पिकांचे रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन करणे सोपे जाते. श्रावण, भाद्रपद, पितृ पंधरवडा या दिवसांत या भाज्यांना चांगली मागणी असते. चांगला दर मिळतो म्हणून राहुल या तरुणाने दोडका व कारले यांचे उत्पन्न घ्यायाचे ठरविले. शहरातील जमिनीत वेगळा प्रयोग राबविण्यासाठी त्याला कसबा येथील सिद्धिविनायक अ‍ॅग्रोचे अभिजीत येवले यांचे मार्गदर्शन झाले. कुटुंबीयांची त्यांना मोलाची साथ असते. त्यामुळेच हे शक्य झाल्याचे राहुल सांगतात.

Web Title: Vegetable cultivation successful in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.