तीन दिवस लोणी काळभोर येथील भाजीपाला बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:06+5:302021-03-18T04:11:06+5:30
लोणी काळभोर समवेत ऊरुळी कांचन परिसरातही कोरोना आपले अस्तित्व मोठ्या प्रमाणात दाखवू लागला आहे. यामुळे लोणी काळभोर प्रमाणे उरुळी ...
लोणी काळभोर समवेत ऊरुळी कांचन परिसरातही कोरोना आपले अस्तित्व मोठ्या प्रमाणात दाखवू लागला आहे. यामुळे लोणी काळभोर प्रमाणे उरुळी कांचन परिसरातील भाजीपाला बाजार व आठवडे बाजार काही काळ बंद ठेवयाची मागणी उरुळी कांचन परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व उरुळी कांचन या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत गेले १० दिवसांपासून कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या कालावधीत उरुळी कांचन हद्दीत ९० पेक्षा जास्त, तर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत ११० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये ग्रामपंचायतीचे ४, तर प्राथमिक आरोग्य केेंद्राच्या दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. यामुळे वरील दोन्ही ग्रामपंचायतीचे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पूर्व हवेेेलीतील पुणे - सोलापूर महामार्गालगत असलेल्या गावातील नागरिक हे आपल्याला कोरोना होणारच नाही या अविर्भावात आपले दैनंदिन व्यवहार करत आहेत. ग्रामपंचायत, आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासन प्रतिबंध करण्या बाबत उपयोजना करत आहेत. मात्र नागरिकांना याचे कसल्याही प्रकारचे गंभीर्य नसल्याचे जाणवत राहिले आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, लोणी काळभोर पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंडाची वसुली सुरु केली आहे. नागरिक दंड भरायला तयार आहेत पण मास्क लावायला तयार नसल्याचे चित्र उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या ग्रामपंचायत हद्दीत दिसून येत आहे. यामुळे या तिनही ग्रामपंचायत हद्दीत पोलिसांनी विना मास्क वावरणाऱ्या नागरीकांच्यावर दंडाची कारवाई अधिक कडक करण्याची गरज आहे.
--
कोट
कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, रायवाडी, मांजरी, महादेवनगर, या परिसरात १ मार्चपासून १०३ जणांना कोरोना रोगाची लागण झालेली आहे. ६२२ लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ११० लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ५१२ नागरिकांचा अहवाल हा निगेटिव्ह आहे. नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याने कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे.
-डॉ. डी. जे. जाधव ( आरोग्य अधिकारी लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र )