भाज्यांचे भाव गडगडले; पण ग्राहकांचा होईना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:48 AM2018-02-09T00:48:57+5:302018-02-09T00:49:09+5:30
जिल्ह्यातील सर्वच बाजारांमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव गडगडले आहेत.
पुणे : जिल्ह्यातील सर्वच बाजारांमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र, पुण्यातील किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव कमी झाले नसल्याने ग्राहकांना फायदा होत नसल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना २ ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. मेथीच्या गड्ड्या पडून राहिल्या, तर वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या भाज्या मार्केटमध्ये शिल्लक राहिल्या. भाज्यांचे भाव कोसळल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी मुबलक पाऊस पडल्याने पालेभाज्यांच्या लागवडक्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, जिल्ह्याबाहेरून येणाºया मालाची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव पडले आहेत.
>महाशिवरात्रीला सहा दिवस अवकाश असल्याने आंध्र प्रदेशातून रताळ्यांची मोठी आवक होत आहे. चाकण येथील बाजारात सोळा टनाचा रताळी घेऊन आलेला ट्रक मागणीअभावी बाजारात उभा राहिला. ट्रक उभा करून त्या व्यापाºयाला उद्या, परवाच्या बाजाराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.