corona virus : पुण्यात भाज्यांचे दर कडाडले, नफेखोरांची लूटमार सुरु, सामान्यांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:13 AM2020-03-24T11:13:07+5:302020-03-24T11:20:54+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लावण्यात आलेल्या संचारबंदीचा नफेखोरांकडून गैरफायदा उचलला जात आहे. गवार १२० रूपये किलो, ब्रेड साधा ५० रूपये, कांदे ८० रुपये किलो, बटाटे ६० रुपये किलो रूपये असे अवाजवी दर लावून नागरिकांची लूट केली जात आहे.
पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लावण्यात आलेल्या संचारबंदीचा नफेखोरांकडून गैरफायदा उचलला जात आहे. गवार १२० रूपये किलो, ब्रेड साधा ५० रूपये, कांदे ८० रुपये किलो, बटाटे ६० रुपये किलो रूपये असे अवाजवी दर लावून नागरिकांची लूट केली जात आहे. प्रशासनाने अशा नफेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जमावबंदी जाहीर केल्यानंतरही लोक रस्त्यावर येत असल्याने सरकारने आता संचारबंदी सुरू केली आहे. नागरिकांना जीवनावश्यक खरेदी करता यावी यासाठी सकाळच्या वेळात थोडी मोकळीक दिली जात आहे.पुणे शहरातील उपनगरांमध्ये किराणा मालाची तसेच भाजीपाल्याची काही दुकाने खुली असतात. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. सकाळी नागरिकांची तिथे खरेदी करण्यासाठी झुंबड उडते आहे.
सध्या सगळ्या भाज्या ३० रूपये पावशेर अशा दराने विकल्या जात आहेत. बटाटे ६० रूपये दराने दिले जात आहेत. अर्धा लिटर दुधाची पिशवी एक लिटरच्या दरात विकली जात आहे. घ्यायचे तर घ्या नाही तर निघा, पुढच्याला येऊ द्या अशा भाषेत विक्रेते नागरिकांची अडवणूक करत आहेत. नागरिकांना याविरोधात तक्रार करायची आहे मात्र करावी कुठे याची माहिती नसल्याने कुरकुरत का होईना आवश्यक गोष्टी चढ्या भावात खरेदी करून गरज भासवली जात आहे. यामुळे महिन्याचे सर्व बजेट कोसळणार असल्याच्या भीतीने सामान्य महिला गांगरून गेल्या आहेत. काही दिवसांसाठी का होईना आवश्यक गोष्टींचा साठा तर करायचा आहे, पण भाव कडाडल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी त्यांची मागणी आहे.
पोलिस रस्ते मोकळे करण्यात तर अन्य अधिकारी वर्ग कोरोना विरोधातील लढ्यात गुंतले आहेत. शहराच्या मध्यभागासह बहुसंख्य उपनगरांमधे हीच स्थिती असून ती तशीच राहिल्यास येत्या काही दिवसात असाधारण परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे