मार्केट यार्डात भाजीपाल्याची वर्षातील विक्रमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:40 AM2019-01-14T00:40:44+5:302019-01-14T00:40:58+5:30
मागणी वाढ : भाजीपाल्यांचे दरही १० ते २० टक्क्यांनी वधारले
पुणे : मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येवर गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी विभागात भाजीपाल्याची यंदाच्या वर्षातील विक्रमी आवक झाली. आवक वाढली, तरी मागणी देखील मोठ्या प्रमाणात असल्याने भेंडी, हिरवी मिरची, पापडी, वांगी, सिमला मिरची, वालवर, भुईमूग शेंग, मटार आणि पावटा या भाज्यांच्या दरामध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली, तर अन्य सर्व फळभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
दर वर्षी संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सर्वच भाज्यांना चांगले दर मिळतात. यामुळे शेतकरी भोगीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजारात विक्रीसाठी आणतात. यंदा भोगी सोमवारी असल्याने रविवार (दि.१३) रोजी तब्बल २५० ट्रक शेतीमालाची तरकारी विभागात आवक झाली. आवक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजार समितीने देखील शनिवार (दि.१२) रोजी रात्री ९ वाजल्यापासूनच शेतकरी आणि आडत्यांना माल विकण्यास परवानगी दिली होती. मालाची आवक वाढून देखील शेतकऱ्यांना नेहमीच्या तुलनेत चांगला दर मिळाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
बाजारात प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून १७ ते १८ ट्रक गाजर, मध्य प्रदेश येथून ३० ट्रक मटार, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले १२०० ते १३०० पोती, टोमॅटो साडेतीन ते चार हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, पावटा ७ ते ९ टेम्पो, गवार ३ ते ४, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, भुईमूग २०० ते २५० पोती, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो , कांदा १२० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची ४० ते ४५ ट्रक इतकी आवक झाली.
हरभरा महागला; अन्य सर्वच पालेभाज्या तेजीत
- मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे मेथी वगळता पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम आहेत. विशेषत: हरभरा गड्डीच्या दरामध्ये तर शेकडा जुडीमागे तब्बल ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. आवक वाढल्याने कोथिंबिरीच्या दरामध्ये काही प्रमाणात घट झाली.
- तरीही कोथिंबिरीचे भाव नेहमीच्या तुलनेत जास्त आहेत. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात ८ ते १४ रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात १५ ते २५ रुपये दराने जुडीची विक्री होत आहे. केवळ मेथीच्या दरामध्ये मात्र जुडीमागे २ रुपयांनी घसरण झाली असून, घाऊक बाजारात जुडीला ३ ते ५ रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात ८ ते १० रुपये दराने जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
- रविवारी येथील बाजारात कोथिंबिरीची तब्बल अडीच लाख जुडी आवक झाली. तर, मेथीची १ लाख जुडी आवक झाली आहे.