भाजीपाला विभागातील १८ आडते बाजार समितीच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:53 AM2020-03-10T11:53:08+5:302020-03-10T11:56:21+5:30
गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील डाळिंब विभागात जानेवारी २०१९ मध्ये डाळिंब घोटाळा उघडकीस
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सेस बुडविणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या डाळिंब व्यापाऱ्यांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. त्यात आता नव्याने भाजीपाला विभागातील १८ आडते बाजार समितीच्या रडारवर आले आहेत. यामध्ये या १८ आडत्यांना तब्बल ४ कोटी ५३ लाख ८९ हजार ९२८ रुपये भरण्याचे आदेश बाजार समितीने दिले आहेत. फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला विभागातील या आडत्यांनी बाजार समितीचा सेस बुडविण्यासह शेतकरी व खरेदीदारांच्या शेतमाल पट्टीत हमाली, भराई/विगतवारी, तोलाई, लेव्हीच्या माध्यमातून अतिरिक्त पैसे वसूल करत लूट केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील डाळिंब विभागात जानेवारी २०१९ मध्ये डाळिंब घोटाळा उघडकीस आणला होता. त्या चार डाळिंब आडत्यांना आठ दिवसांपूर्वी चार डाळिंब आडत्यांना दीडपट दंडासह तब्बल ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपये भरण्याची अंतिम नोटीस बजावली आहे. बाजार समितीने डाळिंब घोटाळ्यानंतर संशयित आडत्यांची दफ्तर तपासणीचे काम हाती घेतले. फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला विभागातील ताब्यात घेतलेल्या एकूण ७२ आडत्यांपैकी आजपर्यंत ३५ आडत्यांची दफ्तर तपासणी पूर्ण झाली आहे. त्यात १८ दोषी आढळलेल्या आडत्यांची नावे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. यावेळी समितीचे उपसचिव सतीश कोंडे, सहायक सचिव दीपक शिंदे आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, की १८ पैकी १४ आडत्यांना बेकायदा वसूल केलेल्या रकमांबाबत कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. यावर खुलासा करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तर, अंतिम नोटीस दिलेल्या चार आडत्यांकडून आत्तापर्यंत ४ लाख ९८ हजार ६२० रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. तर, दफ्तर तपासणीत एका आडत्याकडून कोणतेही येणी बाकी नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्या आडतदार फर्मचे नाव मे.शंकर दिनकर पोमण असे आहे. उर्वरित ३७ आडत्यांच्या दफ्तर तपासणीचे काम सुरू आहे. येत्या ३१ मार्चअखेरपर्यंत ७२ आडत्यांच्या दफ्तर तपासणी व त्यापुढील कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
--
अंतिम नोटीस दिलेले चार आडते आणि दीडपट दंडासह वसुलीची रक्कम
- पंडित पर्वतराव पवार ३ लाख ७ हजार ३९७
- मे.कोरपे आणि कंपनी ४१५ रुपये
- मे.शिवशंकर ट्रेडर्स ६ हजार ३४३
- मे.जवळकर आणि कंपनी २४ लाख १३ हजार ३०५
- एकूण : २७ लाख २७ हजार ४६०