लाॅकडाऊनमुळे भाजीविक्रेते संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:43+5:302021-04-20T04:12:43+5:30
हडपसर : गेल्या वर्षापासून आम्हालासुद्धा कोरोनाची भीती वाटत आहे. मात्र, पोट स्वस्थ बसू देत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी चार-पाचशे ...
हडपसर : गेल्या वर्षापासून आम्हालासुद्धा कोरोनाची भीती वाटत आहे. मात्र, पोट स्वस्थ बसू देत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी चार-पाचशे रुपयांचा भाजीपाला आणतो. त्यातून शंभर-दीडशे रुपये मिळतात. मात्र, लाँकडाऊनमुळे आम्ही संकटात सापडलो आहोत, अशी व्यथा भाजीविक्री करणाऱ्या महिलांनी मांडली. आता पालिकेनेच पुढाकार घेऊन भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. व्यवसाय करणाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे व्यवसाय तरी कसा करायचा? असा सवाल किरकोळ भाजीविक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.कोरोना महामारीची ‘ब्रेक द चैन’ साठी कडक निर्बंध केले आहेत. मात्र, फळ आणि भाजीविक्रेते रस्त्यावर व्यवसाय करीत आहेत. त्यासाठी वेळेचे बंधन शासनाने घालून दिले आहे. तरीही रात्री सहानंतर सोलापूर रस्त्यावर हडपसरमध्ये भाजीविक्री करणाऱ्यांना आता तुम्ही घरी जावा, अशी हात जोडून विनंती पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करीत होते.
साहेब, आमची दररोजची लढाई आहे. कोणी मदतीला येत नाही, उलट आम्हाला चार-दोन शिव्या देतात. वृद्ध महिलांचीही त्यांना कदर वाटत नाही. हातातून भाजीपाला हिसकावून नेतात. आमची कोणालाच कदर नाही, तर आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा अशी व्यथा ८० वर्षीय भाजीविक्रेत्या महिलेने मांडली. त्यांच्याबरोबर तरुण मुलींसह मध्यमवयीन महिलाही गाऱ्हाणे मांडत होत्या. पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी सुरक्षित जागा द्यावी, अन्यता या ठिकाणी दोन तास भाजीविक्री करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या भाजीविक्रेत्यांनी केली.
पालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची सायंकाळी सहा वाजेपर्यंत भीती असते. ते रस्त्यावर थांबून भाजीविक्री करू देत नाहीत. लॉकडाऊनमुळे सायंकाळी सहानंतर खरेदीदार येत नाहीत, अशा कात्रीत भाजीविक्रेते सापडले आहेत. भाजीविक्रेते रस्त्यावर भाजीविक्री करण्यासाठी थांबतात. त्यामुळे पोलिसांनाच त्यांना घरी जा असे म्हणण्याची वेळ आली आहे. आता सहानंतर तुम्ही थांबला तरी खरेदीदार कोणी येणार नाही. कोरोनामुळे कडक निर्बंध जारी केले आहेत, असेही पोलिसांनी भाजीविक्रेत्यांना सांगितले.
सोलापूर रस्त्यावर हडपसरमध्ये भाजीविक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रण विभागाकडून कारवाई करण्याऐवजी त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर पुन्हा कोणी रस्त्यावर भाजीविक्रीसाठी बसले, तर कारवाई करावी, अशी मागणी भाजीविक्री करणाऱ्या महिलांनी केली.
फोटो-भाजीविक्रि