पालेभाज्या, फळभाज्या झाल्या स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:04 AM2018-07-23T02:04:15+5:302018-07-23T02:04:35+5:30
शेवगा, आले, पावट्याच्या दरात मोठी घट
पुणे : संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसाने व गेल्या तीन-चार दिवसांपासून दिलेली उघडीपी यामुळे सध्या शेतीमालासाठी अत्ंयत पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे रविवार (दि.२२) रोजी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे गेल्या अनेक महिन्यांनंतर प्रथमच सर्वच प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या स्वस्थ झाल्या आहेत. दरम्यान, आषाढी एकादशीसाठी बाजारात रताळ्यांची आवक वाढली असून, गतवर्षीच्या तुलनेत चांगले दर मिळत आहे. तर मालवाहतूकदारांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाचा आवक व भाववाढीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये रविवारी १६० ते १७० ट्रक शेतमालाची आवक झाली. यात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने आले, शेवगा आणि पावट्याच्या दरात मोठी घट झाली आहे. तर, आवक घटल्याने गाजराच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. मार्केट यार्डामध्ये परराज्यातून प्रामुख्याने कर्नाटकमधून ६ टेम्पो मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून चार ते पाच ट्रक कोबी, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून ७ ते ८ टेम्पो शेवगा, इंदोर येथून २ टेम्पो गाजर, कर्नाटकातून तोतापुरी कैरी २ टेम्पो, म्हैसूर येथून रताळी २२ ते २५ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले २५०० ते २६०० पोती, टॉमेटो साडेचार ते पाच हजार पेटी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ८ ते १० टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, भुईमूग २०० पोती, रताळी १४ ते १५ ट्रक, गाजर ४ ते ५ टेम्पो, पावटा ७ ते ८ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, कांद्याची ६० ते ७० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची ४० ते ४५ ट्रक इतकी आवक झाली.