खडी मशीन चौकात विचित्र अपघातात वाहनाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 19:57 IST2018-08-07T19:53:31+5:302018-08-07T19:57:16+5:30
चालू असलेला ट्रक अचानक पुढे सरकल्याने त्याच्यापुढे असलेल्या चारचाकी वाहनांना जोरात धडकला. ज्यामुळे यातील एक वाहन त्याच्यापुढे असलेल्या वाहनाच्या वर जाऊन अडकले.

खडी मशीन चौकात विचित्र अपघातात वाहनाचे नुकसान
कोंढवा :- कोंढवा बुद्रुक येथील खडी मशीन चौकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात चार वाहनाचे नुकसान झाले आहे.या वाहनातील सर्वांचे दैव बलवत्तर होते. त्यामुळे कोणालाही कसलीही दुखापत झालेली नाही. परंतु, या चार वाहनाचे बरेच नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि. ७ आॅगस्ट) सकाळी कात्रजकडून खडी मशीन चौकाकडे जात असलेला कंटेनर वाहतूक करणारा ट्रक त्याच्या डाव्या बाजूने जात असलेल्या इनोव्हा क्रिस्टा गाडीला घासून गेला. यात क्रिस्टा गाडीच्या चालकाच्या बाजूचा दरवाज्याचे चांगलेच नुकसान झाले. हे पाहून घाबरलेला ट्रक चालक ट्रक चालू अवस्थेत ठेवून पळून गेला.
चालू असलेला ट्रक अचानक पुढे सरकल्याने त्याच्यापुढे असलेल्या चारचाकी वाहनांना जोरात धडकला. ज्यामुळे यातील एक वाहन त्याच्यापुढे असलेल्या वाहनाच्या वर जाऊन अडकले. ट्रकच्या पुढे असलेल्या चार वाहनांना याचा फटका बसला. या चारही वाहनात असलेल्यांना कसलीही गंभीर दुखापत झाली नाही. सुदैवाने ट्रकच्या पुढे दुचाकी वाहन नव्हते, अन्यथा जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. यावेळी या अपघातामुळे कात्रज बायपासवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोंढवा वाहतूक शाखेने ही वाहने लवकर बाजूला काढली व वाहतूक सुरळीत केली.