नवीन कात्रज बोगद्याजवळ वाहनाला आग; प्रवासी वेळीच गाडीतून उतरल्याने मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 09:40 PM2021-08-23T21:40:30+5:302021-08-23T21:43:56+5:30
मुंबई - बंगळुरू महामार्गावरील घटना; प्रवाशी वेळीच गाडीतून उतरल्याने मोठा अनर्थ टळला
धायरी : मुंबई - बंगळुरू महामार्गावर पुणेच्या दिशेकडून कोल्हापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली. मात्र वाहनांमध्ये असलेल्या दहा प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला . ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, टेम्पो ट्रॅव्हलर (क्रमांक एम एच २३ वाय ३१०८ ) ह्या गाडीचे चालक सिद्धार्थ चौगुले हे इतर ९ प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला निघाले होते. दरम्यान शिंदेवाडी येथील नवीन कात्रज बोगद्यामध्ये आल्यानंतर वाहनातून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने बोगदा पार करून वाहन थांबविले. व प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाश्यांना वाहनातून खाली उतरविले. त्यानंतर काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून अग्निशमन दलाला पाचारण केले. पीएमआरडीएच्या नांदेड सिटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
नांदेड सिटी येथील अग्निशमन केंद्रातील अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक सोन्याबापू नागरे, अतुल रोकडे, शुभम मिरगुंडे, योगेश मायनाळे, श्रीकांत आढाऊ या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.दरम्यान काही काळ वाहतूक रोखल्याने वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंगचे अधिकारी अभिजित गायकवाड तसेच कर्मचाऱ्यांनी जळालेल्या वाहनाला क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेतले. त्यानंतर वाहतूक पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी गाडी मात्र पूर्ण जळाली आहे.
बंगळुरू महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ वाहनाला आग; प्रवासी वेळीच गाडीतून उतरल्याने मोठा अनर्थ टळला.#PUNEpic.twitter.com/Gus8xjLpB8
— Lokmat (@MiLOKMAT) August 23, 2021