पुणे शहरातील वाहन वाढीचा वेग सुसाट; बसव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:07+5:30

सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष

Vehicle growth speedly in Pune city; Unforgivable neglect of the bus system | पुणे शहरातील वाहन वाढीचा वेग सुसाट; बसव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष

पुणे शहरातील वाहन वाढीचा वेग सुसाट; बसव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतुक कोंडीमध्ये पुणे जगात पाचव्या स्थानावरअनेक वर्षांपासून वाहन संख्येत होत असलेली वाढ त्यास कारणीभुतअधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बीआरटीसारखे प्रकल्पांची नितांत गरज रस्त्यांची रुंदी वाढली, उड्डाणपुल उभारण्यात आले. आणखी उड्डाणपुल प्रस्तावित

पुणे : वाहनांची होत असलेली अनिर्बंध वाढ आणि या वाढीसाठी सत्ताधाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे पुणेकर वाहतुक कोंडीत अडकले  आहेत. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने खासगी वाहनांचा वापर वाढत गेला. परिणामी, पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांचा आकडा मागील वर्षीच ६० लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामध्ये एकट्या पुणे शहरातील वाहनांची संख्या जवळपास ३७ लाखांवर पोहचली आहे.

वाहतुक कोंडीमध्ये पुणे जगात पाचव्या स्थानावर पोहचले आहे. मागील अनेक वर्षांपासून वाहन संख्येत होत असलेली वाढ त्यास कारणीभुत ठरली आहे. शहरामध्ये वाढलेल्या शैक्षणिक संस्था, शहरासह लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेले औद्योगिकीकरण, आयटी हब, रोजगाराच्या वाढत्या संधी यांमुळे पुण्यात होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्याही वेगाने वाढत गेली. पण त्याचबरोबर शहरातील वाहनसंख्येचा वेगही प्रचंड वाढला. या वाहनांसाठी रस्त्यांची रुंदी वाढली, उड्डाणपुल उभारण्यात आले. आणखी उड्डाणपुल प्रस्तावित आहेत. पण या सुविधांनी कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी वाढविणे आता जवळपास अशक्य असल्याने वाहनांना रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यातच रस्त्यावर होणारे पार्किंग, बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडीतच भरच पडत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुणे विभागामध्ये पुणे (एमएच १२), पिंपरी चिंचवड (एमएच १४) व बारामती (एमएच ४२) हे तीन जिल्ह्यातील विभाग आहेत. त्याचबरोबर सोलापुर व अकलुज हे दोन विभागही येतात. पुण्यामध्ये (एमएच १२) शहरासह सासवड, शिरूर, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांचा समावेश होतो. यामधील एकुण नोंदणीकृत वाहनांची संख्या २०००-०१ या आर्थिक वर्षात सुमारे ९ लाख होती. पुढील पाच वर्षात त्यामध्ये चार लाखांची भर पडली. तर २०१०-११ मध्ये हा आकडा २० लाख ८७ हजारांवर पोहचला. दि. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत हा आकडा ४० लाख ७२ हजारांवर गेला आहे. म्हणजे २०१०-११ पासून १० वर्षात तब्बल २० लाखांहून अधिक वाहने वाढली आहेत. ‘एमएच १२’ अशी नोंद झालेल्या वाहनांपैकी एकट्या पुणे शहरामधील वाहन संख्या जवळपास ३७ लाख असेल. 
------------------------
पुणे व पिंपरी चिंचवड शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बससेवेकडे मागील काही वर्षात अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागील वर्षभराचा काळ सोडल्यास नवीन बस खरेदी झाली नाही. त्यामुळे जवळपास १० वर्षांहून अधिक वयोमानाच्या निम्म्या बस रस्त्यावर धावत आहेत. त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. कमी बसमुळे अनियमितता, बसमधील गर्दी, बसस्थानकांची दुरावस्था या कारणांनी अनेकांनी पीएमपीकडे पाठ फिरविली. परिणामी खासगी वाहनांच्या संख्येत वाढ होत गेली.वाहनांवर निर्बंध आणावेत का?
वाहनांची वाढती संख्या रोखण्यासाठी नोंदणीवर निर्बंध आणणे, दिल्लीप्रमाणे सम, विषम क्रमांकाच्या वाहनांना रस्त्यावर येण्यास मान्यता देणे, रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, पादचाºयांना प्राधान्य देणे, वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे अशा विविध उपाययोजना करता येऊ शकतात. पीएमपी बससेवेकडे अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बीआरटीसारखे प्रकल्पांची नितांत गरज आहे. अशा प्रकल्पांना अधिक प्राधान्य मिळणे, गरजेचे आहे.

पुण्यातील (एमएच १२) नोंदणीकृत वाहनांची संख्या
वर्ष        वाहन संख्या
२०००-०१    ९,०२,२७४
२००५-०६    १३,५३,११३
२०१०-११    २०,८७,३८५
२०१५-१६    ३०,७२,००३
२०१९-२०    ४०,७२,००३
(३१ डिसेंबर १९ पर्यंत )
--------------

Web Title: Vehicle growth speedly in Pune city; Unforgivable neglect of the bus system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.