वाहनांचा हॉर्न सुरक्षेसाठी असतो, सुमधूर संगीत ऐकण्यासाठी नव्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:59+5:302021-09-18T04:11:59+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कायदेशीर नोटीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये ...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कायदेशीर नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये बसविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेवर प्रसिद्ध श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी आक्षेप घेतला असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात वाहनांच्या हॉर्नच्या आवाजासंबंधी नियमांंमध्ये बदल करणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मोटार वाहन उत्पादक कंपन्यांना हॉर्नच्या संगीतमय आवाजाबद्दल निर्देश देण्यात येणार आहेत. मात्र, कुठलेही नवीन धोरण, कल्पना विज्ञानाधारित असावी असे सांगत डॉ. कल्याणी मांडके यांनी ॲड. असिम सरोदे, ॲड अजित देशपांडे, ॲड अक्षय देसाई यांच्यामार्फत संबंधित मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे. आवाजासंबंधीची ही कल्पना नावीन्यपूर्ण आणि रंजक वाटत असली तरी त्याबद्दल सर्वकष विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नोटिसीेमध्ये नमूद करण्यात आले आहे. हॉर्न हा रस्त्यावरील इतर वाहने, पायी चालणारी माणसे यांना सावध करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी असतो. हॉर्नचा आवाज हा ऐकण्याचा संकेत असून, ऐकण्याची कमी-अधिक क्षमता असणाऱ्या सर्वांनाच ऐकू येईल अशा वारंवारितेच्या ध्वनिलहरींमध्ये असतो, तसेच त्याची तीव्रता देखील विशिष्ट पातळीची असायला हवी. सावधानतेचा इशारा देणारी प्रणाली म्हणून वापरात असलेला हॉर्न जर संगीतमय असेल तर त्याचा माणसाला सावध करण्याचा मुख्य उद्देश पूर्ण होणार नाही, असा मुद्दा नोटिसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
आपल्या देशातील रस्त्यावरील वाहने, पादचाऱ्यांची संख्या, रस्ता क्रॉस करताना आणि वाहतूक कोंडीत होणारा हॉर्नचा वापर या सगळ्यांचा विचार करता अशा परिस्थितीत सतत संगीतमय हॉर्न मोठ्या आवाजात चोहोबाजूंनी ऐकू आल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, असेही नोटिसीमध्ये लक्षात आणून देण्यात आले आहे.
----------